नऊ पालिकांमध्ये प्रशासकीय राजवट

By Admin | Updated: July 5, 2014 00:24 IST2014-07-05T00:24:49+5:302014-07-05T00:24:49+5:30

राज्यातील सर्व नगराध्यक्षांना शासनाने १० जूनला दिलेली मुदतवाढ २ जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत रद्द ...

The administrative regime in nine municipalities | नऊ पालिकांमध्ये प्रशासकीय राजवट

नऊ पालिकांमध्ये प्रशासकीय राजवट

अमरावती : राज्यातील सर्व नगराध्यक्षांना शासनाने १० जूनला दिलेली मुदतवाढ २ जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत रद्द करण्यात आली. याविषयीची अधिसूचना ३ जुलै रोजी काढण्यात आली होती. अधिसुचनेनुसार ५ जुलै रोजी जिल्ह्यातील नऊ नगराध्यक्षांचा मुदतवाढ कालावधी संपुष्टात येत असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे व त्याच दिवसी या नगरपंचायतींवर पुढील आदेशापर्यंत प्रशासकीय राजवट राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
जिल्ह्यातील चिखलदरा वगळता अचलपूर, अंजनगाव (सुर्जी), दर्यापूर, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, धामणगाव, मोर्शी, वरूड व शेंदूरजनाघाट या नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांचा कार्यकाल हा २८ जून २०१४ रोजी संपुष्ठात येणार होता. तत्पूर्वी शासनाने १० जूनला अधिसूचना काढून या पदांच्या निवडणुकांना मनुष्यबळ उपलब्ध नाही हे कारण दर्शवीत सहा महिने किंवा शासन ठरवेल त्या उक्त दिनांकाच्या अगोदरच्या दिवसापर्यंत ही मुदतवाढ होती. दरम्यान २ जुलै रोजी शासनाने आपलाच निर्णय महिनाभऱ्याच्या आत फिरवून ही मुदतवाढ रद्द केली. परिणामी विद्यमान नगराध्यक्षांचा कार्यकाल हा ५ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या नऊही नगराध्यक्षांना शनिवार ५ जुलै रोजी कार्यमुक्त करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. उपाध्यक्षपदाचादेखील कार्यकाळ संपुष्टात आला आहे. परंतु या निवडणुकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा स्थगनादेश आहे. त्यामुळे प्रभार देण्याच्या भानगडीत न पडता जिल्हा प्रशासनाने या नऊही नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The administrative regime in nine municipalities