बच्चू कडूंच्या ‘जंगलबुक’पुढे प्रशासनाचे लोटांगण
By Admin | Updated: June 27, 2016 23:57 IST2016-06-27T23:57:04+5:302016-06-27T23:57:04+5:30
अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी सोमवारी पुकारलेल्या जंगलबुक आंदोलनापुढे प्रशासनाने अखेर लोटांगण घातले.

बच्चू कडूंच्या ‘जंगलबुक’पुढे प्रशासनाचे लोटांगण
पाच तास ठिय्या : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण
अमरावती : अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी सोमवारी पुकारलेल्या जंगलबुक आंदोलनापुढे प्रशासनाने अखेर लोटांगण घातले. सलग पाच तास पावसात चाललेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली. अखेर आ. कडूंनी ठेवलेल्या मागण्या पूर्ण करीत असल्याचे लेखी पत्र वनविभागाकडून देण्यात आले नि आंदोलन सुटले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक कार्यालयासमोर जंगलबूक आंदोलन दुपारी १ वाजताच्या सुमारास सुरू करण्यात आले. आ. बच्चू कडू यांचे आंदोलन वेगळे वळण घेणार ही माहिती पोलिसांच्या गुप्तचर विभागाला होती. त्यानुसार पोलीस प्रशासनाकडून स्थानिक गर्ल्स हायस्कूल ते सार्वजनिक बांधकाम विभागादरम्यान मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आंदोलन कोणत्याही क्षणी वेगळ्या वळणावर जाईल
प्रशासन घामाघूम
अमरावती : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक दिनेश त्यागी यांना २२ जून रोजी दिलेल्या पत्रानुसार समस्यांवर चर्चा करीत होते.
अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सर्वेअर राठोड, गुल्लरघाटचे उपसरपंच उंबरकर यांच्यावर कारवाईची मागणी रेटून धरली. आ. बच्चू कडू यांनी ‘जंगलबूक और आदमी की लूट’ असा कारभार चालत असल्याचा आरोप केला. व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करताना प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या १० लाख रुपयांच्या रक्कमेतून २ लाख रुपये हे अकोटचे वन्यजीव उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी हडपले, असा आरोप त्यांनी केला. उपवनसंरक्षक वर्मा हे भ्रष्टाचारी असून प्रकल्पग्रस्तांना त्रास देतात, ही बाब त्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक दिनेश त्यागी यांच्या निदर्शनास आणून दिली. वर्मा यांची बदली तर राठोड यांचे निलंबन याविषयावर सलग २ ते ३ तास चर्चा चालली. दरम्यान प्रकल्पग्रस्तांना आ. कडू यांनी बोलते केले. अकोट येथे ये-जा करण्यासाठी असलेला ७ कि. मी. चा बंद करण्यात आलेला जुना रस्ता, पुनर्वसित गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव अशा विविध प्रश्नांवर आ. कडूंनी प्रहार केला. ‘एका वाघाची व्यवस्था करताना मानसं मारु नका’ असा सल्ला आ. कडू यांनी अधिकाऱ्यांना दिला. दरम्यान डीएफओ वर्मा यांची बदली, सर्वेअर राठोड यांचे निलंबन करण्यासह प्रकल्पग्रस्तांना मूलभूत सोई सुविधा, व्यवसायासाठी मार्ग मोकळा करणे आदी मागण्यांवर आ.कडू कायम होते. मात्र या मागण्यांच्या पूर्ततेसाठी व्याघ्र प्रक ल्पाचे क्षेत्र संचालक दिनेश त्यागी यांनी महिन्याभराचा वेळ मागितला. परंतु आ. बच्चू कडू मागण्यांवर ठाम होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी मागण्या पूर्ण करीत नसल्याचे बघून आ. कडू यांनी मागण्या मान्य करण्यासाठी दोन तासाचा ‘अल्टिमेटम’ दिला. त्यानंतर ते काही समर्थकांसह बाहेर भर पावसात सुरु असलेल्या आंदोलनात सहभागीे झाले. आ. बच्चू कडू बाहेर येताच आंदोलकांमध्ये उत्साह संचारला. त्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन करताना मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही. आता ही लढाई ‘आर या पार’ ची असून गोळीबार अथवा लाठीचार्ज झाला तरिही बेहत्तर पण, मागे हटणार नाही, असे आ. कडू म्हणताच आंदोलकांनी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाचे प्रवेशद्वार भेदून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक व पोलिीसात चकमक झाली. पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. अखेर जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी पुढाकार घेत आ. कडू यांच्या संपूर्ण मागण्या मान्य करण्याचा शब्द दिला. त्यानुसार आ. कडू यांना व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक त्यागी यांनी लेखी पत्र दिले.
शिक्षणापासून वंचित ठेवले
आ. बच्चू कडू यांनी जंगलबुक आंदोलनादरम्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याचा आरोप केला. चार वर्षापासून शाळा उपलब्ध नसल्याने ही मुले शिक्षणापासून दूर राहिल्याचा ठपका ठेवला. ‘राईट्स टू इन्फॉरमेशन’ या कायदाअंतर्गत शिक्षणापासून वंचित ठेवल्याप्रकरणी वनाधिकाऱ्यांवर गुन्हे का दाखल करु नये, असे आ. कडू म्हणाले.
पोलीस, आंदोलकांमध्ये चकमक; सौम्य लाठीमार
आ. बच्चू कडू यांनी सोमवारी जंगलबुक हे अभिनव आंदोलन करून मेळघाट व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करण्यास प्रशासनास भाग पाडले. मात्र सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हे आंदोलन वेगळ्या वळणावर पोहोचत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक उडाली. व्याघ्र प्रकल्प कार्यालयाचे प्रवेशद्वार भेदून आंदोलक प्रवेश करताना पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी सौम्य लाठीमारदेखील करण्यात आला. हा सर्व प्रकार भरपावसातच सुरू होता.
सुतळी बॉम्बचे धमाके
सोमवारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयावर जंगलबुक आंदोलनादरम्यान आ. बच्चू कडू यांच्या समर्थकांनी सुतळी बॉम्ब फोडून प्रशासनाचे लक्ष वेधले. सुतळी बॉम्ब फोडण्याचा सिलसिला सलग पाच तास चालला, हे विशेष. अचानक फटाके फुटत असल्यामुळे पोलीस प्रशासनाची भंबेरी उडाली होती.