प्रशासनाला प्रतीक्षा ‘महाड’ पुनरावृत्तीची !

By Admin | Updated: August 5, 2016 00:10 IST2016-08-05T00:10:48+5:302016-08-05T00:10:48+5:30

वलगावपासून चार किलोमीटर अंतरावरील सावरखेड येथे जाण्यासाठी असलेल्या ‘पूल वजा बंधाऱ्या’च्या चवथ्या क्रमांकाच्या कमानीची दगडाची भिंत पूर्णपणे खचली आहे.

Administration waiting for 'Mahad'! | प्रशासनाला प्रतीक्षा ‘महाड’ पुनरावृत्तीची !

प्रशासनाला प्रतीक्षा ‘महाड’ पुनरावृत्तीची !

पेढी नदीवरचा ‘पूल वजा बंधारा’ : चवथ्या कमानीची भिंत खचली, २५ वर्षांत चार वेळा वाहून गेला पूल
अमरावती : वलगावपासून चार किलोमीटर अंतरावरील सावरखेड येथे जाण्यासाठी असलेल्या ‘पूल वजा बंधाऱ्या’च्या चवथ्या क्रमांकाच्या कमानीची दगडाची भिंत पूर्णपणे खचली आहे. लघुपाटबंधारे विभागाने एक कोटींपेक्षा अधिकचा खर्च केलेल्या या पुलावर कोणत्याही क्षणी ‘महाड’ची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी स्थिती आहे. मागील २५ वर्षांत तब्बल चार वेळा हा पूल वाहून गेलाय. पाटबंधारे विभागाला दुरूस्तीसाठी आता नरबळी हवेत काय? असा गावकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.
सावरखेडसह तुळजापूर, चमरापूर गावांना जोडण्याचा एकमेव मार्ग म्हणून तसेच कुंड (सर्जापूर), खारतळेगाव येथील शेतकऱ्यांच्या आवागमनासाठी असलेल्या या मार्गावरील पेढी नदीवर सन १९८९ मध्ये जिल्हा परिषदेद्वारा पाटबंधारे विभागाने ‘पूल वजा बंधाऱ्याचे’ काम सुरू केले. त्यावेळी ८ लाख ४२ हजार रूपये खर्च दाखविण्यात आला. लगेच दोन वर्षांनी म्हणजे सन १९९१ मध्ये या पुलाच्या कमानी खचल्या. त्यानंतर हे काम लघुपाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर) यांच्याकडे वर्ग करण्यात आले. यावर पुन्हा ४१ लाख रूपये खर्च करण्यात आलेत. मात्र, भ्रष्टाचारी यंत्रणेमुळे काम निकृष्ट झाले. परिणामस्वरूप हा बंधारा नोव्हेंबर १९९६ मध्ये पुन्हा वाहून गेला. सन १९९८ मध्ये पेढी नदीला आलेल्या पुरात हा पूल पुन्हा क्षतिग्रस्त झाला व लगतची शेकडो एकरी शेती खरडली गेली. या ‘पूल वजा बंधाऱ्या’ची दुरूस्ती करण्यासाठी पुन्हा ४५ लाखांचे नवे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी हा पूल कधी खचतो तर कधी वाहून जातो ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ या संकल्पनेच्या अनुषंगाने हा बंधारा फक्त ‘शासनाचा पैसा जिरवा अन् ्अधिकारी, कंत्राटदारांची तुंबडी भरा’ अशाच स्वरूपाचा राहिला आहे. मूळ आठ लाखांच्या या बंधाऱ्यावर आतापर्यंत तब्बल सव्वादोन कोटी रूपयाचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या यंत्रणेने या बंधाऱ्याची वाट लावली. दरवर्षी पावसाळ्यात हा पूल क्षतिग्रस्त होत आहे. आता तर या पुलाची दगडी भिंतच खचल्याने कुठल्याही क्षणी हा पूल वाहून जाणार, अशी स्थिती आहे. काल -परवा महाडची जी घटना घडली त्याचीच पुनरावृत्ती या पुलावर होण्याची भीती निर्माण झाली आहे.

सुरक्षा कठडे नाहीत, स्लॅबवर मोठे खड्डे
या ‘पूल कम बंधाऱ्या’ची सद्यस्थिती फार विदारक आहे. साक्षात मृत्यूला चकमा देत या पुलावर वाहतूक होत आहे. पुलाखालील दगडी कमानी खचल्या आहेत. पुलाला सुरक्षा कठडे नाहीत. पुलाच्या पृष्ठभागावर कित्येक फूट खोल खड्डे पडले आहेत. सुरक्षा कठड्याअभावी शाळकरी विद्यार्थी कित्येकदा पडले. जनावरे पडलीत. मात्र भ्रष्टाचाराने बरबटलेल्या बेपर्वा यंत्रणेला अजून जाग आली नाही.

मुलभूत सुविधा हा नागरिकांचा हक्कच
सावरखेड हे ३०० ते ४०० कुुटुंबांचे गाव. यापैकी नदीकाठची केवळ ३० ते ४० घरे बुडित क्षेत्रात येतात. त्यांचे पुनर्वसन होणार आहे. शासकीय यंत्रणा मात्र नागरिकांच्या मुलभूत व घटनादत्त अधिकारांवर घाला घालीत आहे. रस्ते, पाणी, वीज, पूल आदी समस्या तातडीने निकाली काढाव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ५ लाखांचे अंदाजपत्रक, महात्मा फुले अभियानांतर्गत शासनाला सादर केले. मात्र, हे गाव बुडित क्षेत्रात असल्याने हे काम नामंजूर करण्यात आले.
- शरद तायडे, कार्यकारी अभियंता,
लघुसिंचन, पाटबंधारे विभाग

या पुलाचा बेस व पिअर मूळ जागा सोडून बाजूला सरकला आहे .त्यावरच स्लॅबचे वजन असल्याने या पुलावरुन वाहतूक करणे धोक्याचे आहे. पुलाचा स्लॅब केव्हाही कोसळून जीवितहानी होऊ शकते.
- प्रशांत श्रीराव,
बांधकामतज्ज्ञ (एम.ई.)
 

Web Title: Administration waiting for 'Mahad'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.