हिवरखेड येथील अवैध बांधकाम थांबविण्यास प्रशासन असमर्थ
By Admin | Updated: March 14, 2015 00:39 IST2015-03-14T00:39:31+5:302015-03-14T00:39:31+5:30
शासनाच्या जागे सोबतच शेजाऱ्याच्या खुल्या प्लॉटवर अवैधरीरत्या सुरु असलेले बांधकाम थांबविण्यास प्रशासन असमर्थ ठरल्यामुळे शेवटी..

हिवरखेड येथील अवैध बांधकाम थांबविण्यास प्रशासन असमर्थ
मोर्शी : शासनाच्या जागे सोबतच शेजाऱ्याच्या खुल्या प्लॉटवर अवैधरीरत्या सुरु असलेले बांधकाम थांबविण्यास प्रशासन असमर्थ ठरल्यामुळे शेवटी न्याय मागायचा कोणाकडे, हा प्रश्न हिवरखेड येथील महिलेसमोर उपस्थित झाला आहे.
हिवरखेड येथील पंचफुलाबाई महादेवराव तंतरपाळे यांना घर बांधण्याकरिता महसूल विभागातर्फे रकमेचा भरणा करुन २००२ मध्ये खुला प्लॉट देण्यात आला होता. त्याच वेळेस अंबादास पंडागळे या लाभार्थ्यालासुध्दा पंचफुलाबाई यांच्या शेजारी असलेला प्लॉट देण्यात आलेला होता. मात्र पंडागळे यांनी शासकीय रकमेचा भरणा केलेला नाही. त्यामुळे नायब तहसीलदार यांनी ८ जानेवारी २०१५ रोजी पत्र पाठवून त्यांचा या भूखंडावर कोणताही हक्क राहिला नसल्याचे कळविले आहे.
पंडागळे यांनी मागील दोन महिन्यांपासून शासनाच्या या जागेवर अतिक्रमण करुन शिवाय शेजारच्या पंचफुलाबाई तंतरपाळे यांच्या ताब्यातील रिकाम्या जागेवरसुध्दा पक्के बांधकाम सुरु केले.
पंचफुलाबाई यांनी पंडागळे यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. ग्राम पंचायतीपासून तर आमदारांपर्यंत तक्रारी नोंदविल्या; मात्र पंडागळे यांचे बांधकाम मात्र कोणताही अधिकारी थांबवू शकला नाही. त्यामुळे कोणताही अधिकारी आपले बांधकाम थांबवूच शकत नसल्याची गर्वोक्ती सुध्दा पंडागळे करीत असल्याचा पंचफुलाबाई यांचा आरोप आहे.
महसूल विभागाच्या प्लॉट वर अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी खऱ्या अर्थाने महसूल विभागाची आहे. तसेच तक्रारीनंतरही या बाबीकडे लक्ष दिले जात नाही. दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय आणि चक्क दुसऱ्याच्या प्लॉटवर अतिक्रमण केले जात असताना मात्र ग्रामपंचायत प्रशासनसुध्दा मूग गिळून बसले असल्यामुळे, शेवटी याप्रकरणी न्याय मागायचा कोणाला, हा प्रश्न पंचफुलाबाई तंतरपाळे यांना पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)