झपाटलेल्या तरूणांनी हलविले प्रशासन

By Admin | Updated: June 22, 2016 00:13 IST2016-06-22T00:13:06+5:302016-06-22T00:13:06+5:30

तिवसा तालुक्यातील झपाटलेल्या तरूणांनी जीवावर उदार होऊन तीन दिवस अहोरात्र जे परिश्रम उपसले त्यामुळेच ....

The administration moved by the haunted young men | झपाटलेल्या तरूणांनी हलविले प्रशासन

झपाटलेल्या तरूणांनी हलविले प्रशासन

सत्याचा आग्रह : सलग तीन रात्री केले पुरावे गोळा
अमरावती : तिवसा तालुक्यातील झपाटलेल्या तरूणांनी जीवावर उदार होऊन तीन दिवस अहोरात्र जे परिश्रम उपसले त्यामुळेच अवैध रेती वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाला नाईलाजाने कारवाई करावी लागली.
तिवसा तालुक्यातून रात्रभर रेतीचे अनेक ट्रक नियमबाह्यरीत्या धावत असतात. नागपूर-अमरावती महामार्गावरून या मालमोटारींचे आवागमन असते. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हिच स्थिती आहे. सर्वत्र रेती घाटावरून रात्रीचा मनसोक्त रेती उपसा केला जात असताना तिवसा तालुक्यातील काही तरुणांनी मात्र त्यांच्या परिसरातील हा अवैध आणि जीवघेणा व्यापार रोखण्याचे मनी ठाणले.
छत्रपती संघटनेचे वैभव वानखडे आणि त्यांच्या तमाम मित्र मंडळींनी अवैध रेती व्यवसायाचे पुरावेच गोळा करण्याचे ठरविले. तीन रात्री डोळ्यात अंजन घालून मोबाईलमध्ये या तरूणांनी व्हिडीओ शूटिंग आणि छायाचित्रीकरण केले. वॉट्सअ‍ॅपवरील ज्या एका ग्रुपवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांचा सहभाग आहे, त्या ग्रुपवर या तरुणांनी अवैध रेती वाहतुकीचे पुरावे अपलोड केले. आक्रमक चर्चा ग्रुपवर सुरू झाली. रात्री दोन वाजता पकडलेला ट्रक असो वा पहाटे ४ वाजता - लगेच व्हीडीओ वा फोटो अपलोड झालेच म्हणून समजा. तरुणांनी सत्यासाठी पुराव्यानिशी धरलेला आग्रह अखेर परिणामकारक ठरला. जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना उशीरा आणि नाईलाजाने का होईना, कारवाईचे आदेश द्यावे लागले. दोन रात्री वाळू माफीयांशी एकाकी झुंज देणाऱ्या तरुणांच्या मदतीला निगरगट्ट तहसीलदार आणि त्यांची चमू हजर झाली.
खरे तर भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या या तरुणांची दखल पहिल्याच दिवशी घ्यायला हवी होती. परंतु प्रशासनाने त्यातही संधी शोधण्याचा प्रयत्न केला. ध्येयाने पेटलेल्या तरुणांच्या इराद्यात बदल होत नसल्याचे बघून जिल्हा प्रशासन नमले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले कारवाईचे आदेश खरे तर तिवस्यातील वैभव वानखडे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या लढ्याचेच यश होय.

Web Title: The administration moved by the haunted young men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.