कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन यंत्रणा कोलमडली
By Admin | Updated: July 21, 2014 23:38 IST2014-07-21T23:38:36+5:302014-07-21T23:38:36+5:30
आपल्या विविध मागण्यांसाठी स्थानिक नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी १५ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपात नगरपालिकेच्या विविध विभागांतील सर्वच कर्मचारी सहभागी झाल्यामुळे चांदूरवासियांना न.प.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन यंत्रणा कोलमडली
दुरवस्था : नागरिकांची विविध कामे प्रलंबित, प्रभाग घाणीच्या विळख्यात
सुरेश सवळे - चांदूरबाजार
आपल्या विविध मागण्यांसाठी स्थानिक नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी १५ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपात नगरपालिकेच्या विविध विभागांतील सर्वच कर्मचारी सहभागी झाल्यामुळे चांदूरवासियांना न.प. कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत संपाची झळ पोहोचत आहे. त्यांची विविध कामे प्रलंबित असल्यामुळे आता नागरिकांना नगरपालिका कर्मचाऱ्यांचा संप संपण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
नगरपालिकांच्या विविध मागण्यांसाठी १५ जुलैपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका आता संबंधित नागरिकांना जाणवू लागला आहे. अशातच शहरातील दैनंदिन स्वच्छता हा नगरातील प्रमुख मुद्दा असून शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पावसाचे पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याचे चिन्ह दिसत आहे. दुसरीकडे न.प. चा प्रकाश विभागही आता मंदावत चालला आहे. या विभागाच्या माध्यमातून शहरातील दैनंदिन पथदिवे दुरुस्तीचे कार्य चालत असल्यामुळे आता शहरातील पथदिवे बंद पडल्याने सर्वत्र अंधार पसरला आहे.
मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे नागरिकांना आवश्यक ते दस्तऐवज नगरपालिकेकडून मिळू शकत नसल्याने शहरातील नागरिकांना विविध लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. जसे रहिवासी दाखले, अससमेंट नक्कल सह दैनंदिन शासकीय, निमशासकीय, कार्यासाठी लागणारे न.प. संबंधित दस्ताऐवज मिळण्याचे कार्य गेल्या १५ जुलैपासून रखडल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांना या संपाचा फटका बसत आहे. शहरातील साफ-सफाईचे कामबंद असल्याने नाल्या तुंबल्या असून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी आता शहरातील मुख्य रस्त्यावरुन वाहत असल्याचे चित्र दिसत आहे.
नगरातील नागरिकांना जन्म-मृत्यूचे दाखलेसह तर विभागाच्या कराचा भरणासह व्यापार संकुलातील व्यापाऱ्यांच्या पावसाळ्यातील अडी-अडचीणींसह गाळेधारकांचे विविध काम गेल्या पाच दिवसांपासून रखडले आहे. (तालुका प्रतिनिधी)