जिल्ह्यातील ४९६ पोलीस पाटील पदभरतीला स्थगिती
By Admin | Updated: July 16, 2015 00:25 IST2015-07-16T00:25:03+5:302015-07-16T00:25:03+5:30
ग्राामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आज बुधवारी जिल्ह्यातील ४९६ पोलीस पाटील पदभरतीला जिल्हा प्रशासनाने स्थगिती दिली आहे.

जिल्ह्यातील ४९६ पोलीस पाटील पदभरतीला स्थगिती
ग्रा.पं. निवडणूक आचारसंहिता : प्रशासनाकडे अनेक तक्रारी
मोहन राऊत अमरावती
ग्राामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आज बुधवारी जिल्ह्यातील ४९६ पोलीस पाटील पदभरतीला जिल्हा प्रशासनाने स्थगिती दिली आहे. आचारसंहितेच्या समाप्तीनंतर पुन्हा या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यातील १८ ग्रापंचायती तसेच ९१ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीची अधिसूचना २९ जून रोजी जारी झाली. या ग्रामपंचायतींची निवडणूक २७ जुलै रोजी होणार आहे. जिल्ह्यात पोलीस पाटील पदभरती प्रक्रियेला वेग आला असताना आता एकाएकी ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना याच गावातील पोलीस पाटील पदभरतीची प्रक्रिया सुरु असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या. काहींनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे गंभीर तक्रार केली.
जिल्ह्यात जुलै महिन्यात काही ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे तर माहे आॅगस्ट, सप्टेंबर ते आॅक्टोबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिताही सुरू झाली आहे. यामुळे होणारी अडचण लक्षात घेता या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे.
अमरावती उपविभागातील १९, चांदूररेल्वे ८५, अचलपूर ६६, दर्यापूर ७५, मोर्शी ६७, धारणी ८७, भातकुली ९७ अशा एकंदरीत ४९६ पोलीस पाटलांची भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
चांदूररेल्वे उपविभागातील ८५ गावांमधील पोलीस पाटील पदभरतीकरिता मंगळवारी आरक्षण जाहीर करण्यात आले. परंतु बुधवारपासून पुढील प्रक्रियेला सरूवात होण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया थांबली आहे.
-नितीन व्यवहारे,
उपविभागीय अधिकारी, चांदूररेल्वे