‘एडीफाय’ची परवानगी रद्द !
By Admin | Updated: June 24, 2016 23:57 IST2016-06-24T23:57:23+5:302016-06-24T23:57:23+5:30
देवी एज्युकेशन सोसायटीने एमडीएन एडीफाय एज्युकेशन प्रा. लिमिटेडशी केलेला करार आरटीईमधील तरतुदीचा भंग करणारा असल्याने...

‘एडीफाय’ची परवानगी रद्द !
शिक्षणाधिकाऱ्यांची शिफारस : आरटीईमधील तरतुदीचा भंग
अमरावती : देवी एज्युकेशन सोसायटीने एमडीएन एडीफाय एज्युकेशन प्रा. लिमिटेडशी केलेला करार आरटीईमधील तरतुदीचा भंग करणारा असल्याने या शाळेला दिलेली परवानगी रद्द करण्याची शिफारस शिक्षणाधिकाऱ्यांनी ताज्या अहवालात केली आहे.
चौकशी अधिकारी तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी एस. एम. पानझाडे यांनी एडीफाय शाळेबाबतचा सर्वंकष अहवाल २४ जून रोजी शिक्षण संचालकांकडे पाठविला आहे. या पत्रातून शालेय शिक्षण विभागाने देवी एज्युकेशन सोसायटीच्या एडीफाय शाळेला दिलेली परवानगी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली. शिक्षण संचालकांना पाठविलेल्या या शिफारसपत्राच्या प्रति प्रधान सचिवांसह सर्व उच्चपदस्थांना पाठविण्यात आल्या आहेत.
देवी एज्युकेशन सोसायटी यांना एडीफाय एज्युकेशन स्कूल नावाने स्वयंअर्थसहाय्यीत शाळा म्हणून नवीन शाळा स्थापन करण्यासाठी परवानगी प्राप्त झाली आहे. तथापि चौकशी अहवालानुसार देवी एज्युकेशन सोसायटीने एमडीएम एडीफाय प्रा. लि. स्कूल या नावाच्या कंपनीशी शैक्षणिक बाबीचा करार केल्याचे संस्थेनेच सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरुन स्पष्ट होते. ही बाब आरटीई कायदा २००९-२०११ अन्वयेच्या तरतुदीचा भंग करणारी आहे, असे निरीक्षण शिक्षणाधिकारी पानझाडे यांनी नोंदविली आहे. त्या पार्श्वभूमिवर सदर शाळेला दिलेली परवानगी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे कारवाईचा चेंडू शिक्षण संचालकांच्या कोर्टात गेला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १७ जून रोजी राज्यातील तीन हजारांपेक्षा अधिक शाळांना स्वयं अर्थसहाय्यीत तत्वावर परवानगी दिली होती. त्यानंतर आमच्या एडीफाय शाळेला शासनाची मान्यता मिळाल्याचा दावा देवी शिक्षण संस्थेकडून करण्यात आला. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल आणि शिफारसीवरून दाव्यामधील भंपकपणा उघड झाला आहे.
पालकांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातील अभिप्रायासह शिक्षण संचालक, जिल्हाधिकारी, शिक्षण उपसंचालकांच्या पत्रान्वये १७ जूनला प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे आणि शिक्षण विस्तार अधिकारी किशोर पुरी यांनी 'एडीफाय'च्या नियमबाह्यतेची चौकशी केली. कुठलीही परवानगी नसताना राबविलेली प्रवेश प्रक्रिया आणि फ्रेंचाईसीशी केलेला करार नियमबाह्य ठरवीत शिक्षणाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या. यात परवानगी नसताना प्रवेश केल्यामुळे देवी शिक्षण संस्थेवर शिस्तभंगाची शिफारस करण्यात आली. पालकांना प्रवेशाची रक्कम शाळा व संस्थेने परत करावी, अशी शिफारस करण्यात आली होती. त्यापुढे जावून २४ जूनला शिक्षणाधिकारी पानझाडे यांनी आता या शाळेला मिळालेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी शिफारस करून थेट मुळावर घाव घातला आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात ‘एडीफाय’ शाळा सुरू होण्याची शिक्षण संस्थेची आशा संपुष्टात येणार आहे. (प्रतिनिधी)
नोंदणी प्रमाणपत्रापूर्वीच फ्रेंचायसीशी करार
शैक्षणिक संस्था म्हणून देवी एज्युकेशन सोसायटीला १ सप्टेंबर २०१५ रोजी नोंदणी प्रमाणपत्र मिळाले. मात्र संस्थेने नोंदणी होण्यापूर्वीच २४ आॅगस्ट २०१५ रोजी तेलंगणाच्या ‘एडीफाय’ या कंपनीची फ्रेंचायसी घेतली, तसा करार केल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे परवानगी गृहित धरूनच 'एडीफाय'ने मोठमोठ्या जाहिराती करून पालकांना आकर्षित केले. प्री-प्रायमरी व इयत्ता पहिली व दुसरीत प्रवेशही दिलेत. सर्व घडत असताना शिक्षणाधिकारी काय करीत होते, हा प्रश्न उपस्थित होतो.
नवीन शाळेला परवानगी देत असताना संबंधित शिक्षण संस्थेचा मागील तीन वर्षांचा लेखा परीक्षण अहवाल मागितला जातो. देवी शिक्षण संस्था तर १ सप्टेंबर २०१५ ला नोंदणीबद्ध झाली.