एडीफायमधील प्रवेशाला मनाई

By Admin | Updated: July 6, 2016 00:02 IST2016-07-06T00:02:05+5:302016-07-06T00:02:05+5:30

एडीफायमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास पालक स्वत: जबाबदार राहतील,...

Adiphay access forbidden | एडीफायमधील प्रवेशाला मनाई

एडीफायमधील प्रवेशाला मनाई

शिक्षणाधिकाऱ्यांचा निर्णय : विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
अमरावती : एडीफायमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास पालक स्वत: जबाबदार राहतील, त्यामुळे या शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश देऊ नये, असे अवाहन शिक्षण विभागाने अमरावतीवासीयांना केले आहे. या आवाहनाने एडीफायच्या अनधिकृततेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
देवी एज्युकेशन सोसायटी, कठोराद्वारे संचालित एडीफाय शाळेला शासनाची परवानगी असली तरी या शाळेने फ्रेंचायसी घेतल्याने या संस्थेने आरटीईतील तरतुदींचा भंग केला आहे. शैक्षणिक सत्र सुरू असताना शासनाने परवानगी काढल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.

समायोजनाची जबाबदारी नाकारली
अमरावती : ही संभाव्य कारवाई लक्षात घेता कोणत्याही पालकांनी या शाळेत पाल्यांना टाकू नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेश घेतल्यास त्या नुकसानास पालक स्वत: जबाबदार राहतील, विद्यार्थी समायोजनाची जबाबदारी शिक्षण विभाग घेणार नाही, अशी सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम. पानझाडे यांनी पालकांना केली आहे. शासनाची कुठलीच परवानगी आणि मंजुरी नसताना एडीफायने नियमबाह्य फ्रेंचायसी घेतली आणि प्रवेशाच्या नावावर पालकांची आर्थिक लुबाडणूक चालविल्याचा आरोप रवी पाटील यांच्यासह अन्य पालकांनी केला होता. याबाबत शिक्षण विभागासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली. त्याअनुषंगाने प्र्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम. पानझाडे यांनी चौकशी केली. चौकशीनंतर एडीफाय शाळाच नियमबाह्य असल्याचा अहवाल त्यांनी दिला. फ्रेंचायसीसह राबविलेली प्रवेशप्रक्रियाही अनधिकृत ठरविण्यात आली. तसा अहवाल थेट मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात आला. त्यात संस्थेविरुध्द शिस्तभंगाची कारवाईची शिफारस करण्यात आली. तथापि आपल्या शाळेला परवानगी मिळाल्याने आतापर्यंत झालेले प्रवेश नियमानुकूल ठरतात, असा दावा शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात येत असल्याने काही पालक या बातावणीला बळी पडत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने पुन्हा एकदा एडीफायच्या अनधिकृततेवर शिक्कामोर्तब करीत या शाळेत प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन केले आहे.

या सहा शाळाही अनधिकृत
जिल्ह्यातील सहा शाळा अनधिकृत असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. यात बुद्धीष्ट इंटर नॅशनल इंग्लिश स्कुल तिवसा, सेंन्ट जेम्स प्राथमिक शाळा मोर्शी, अग्रगामी इंग्लिश स्कुल अंजनगाव सुर्जी, एस.डी.एफ.इंग्लिश स्कुल गणेडीवाल ले आऊट अमरावती, ब्लॉसम इंग्लिश स्कुल राजापेठ अमरावती, आयडियल इंग्लिश स्कुल, तिवसा या शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश इयत्ता पहिली मध्ये घेऊ नये. शहरामधील काही शाळांनी सिबीएससी बोडार्ची मान्यता न घेता सिबीएससी करीता विद्यार्थी प्रवेश निश्चित केले आहे. अशा सर्व शाळांवर एफआयआर दाखल करण्याची कार्यवाही देखील शिक्षण विभाग करणार आहे.

माझ्या संस्थेच्या ‘एडीफाय’ला शासनाने परवानगी दिली आहे. शाळेतील प्रत्येक प्रक्रिया नियमानुकूल आहे.
- पूरण हबलानी, देवी एज्युकेशन सोसायटी

एडीफायसह अन्य सहा शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये. परवानगी केव्हाही रद्द होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या नुकसानीची जबाबदारी पालकांची राहील.
- श्रीराम पानझाडे, शिक्षणाधिकारी

Web Title: Adiphay access forbidden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.