अतिरिक्त बांधकाम ‘सीएम’च्या दरबारात
By Admin | Updated: October 20, 2015 00:28 IST2015-10-20T00:28:56+5:302015-10-20T00:28:56+5:30
महानगरातील अतिरिक्त बांधकामाबाबत धोरण निश्चितीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारात १५ दिवसांत नेला जाईल, असा निर्णय आ. सुनील देशमुख यांनी सोमवारीे घेतला.

अतिरिक्त बांधकाम ‘सीएम’च्या दरबारात
दोन तास चर्चा : सुनील देशमुखांची महापालिकेत आढावा बैठक
अमरावती : महानगरातील अतिरिक्त बांधकामाबाबत धोरण निश्चितीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारात १५ दिवसांत नेला जाईल, असा निर्णय आ. सुनील देशमुख यांनी सोमवारीे घेतला. विकास कामांबाबत आढावा घेताना अतिरिक्त बांधकामांबाबत आयुक्तांच्या कामकाजावर देशमुखांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.
महापालिकेत आढावा बैठकीला पक्षनेता बबलू शेखावत, सभापती विलास इंगोले, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, प्रवीण हरमकर, प्रकाश बनसोड, संजय अग्रवाल, तुषार भारतीय, दिंगबर डहाके, प्रदीप दंदे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, बाळासाहेब भुयार, प्रशांत वानखडे, जावेद मेमन, अजय गोंडाने आदी उपस्थित होते. यावेळी स्मार्ट सिटी उपक्रम, रमाई आवास योजना, वैयक्तिक नळ जोडणी व शौचालय योजना, शहर परिवहन सेवा, मालमत्ता कर वसुली आदी विषयांवर मंथन करण्यात आले. मात्र अतिरिक्त बांधकाम प्रकरणी विशेष व्यक्तिंना लक्ष्य करुन कारवाई होत असल्याचा मुद्यावर आ. देशमुखांनी प्रशासनाला निरुत्तर केले. यावेळी माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी एफएसआय बाबत धोरण निश्चित केले नसताना कारवाई करता येत नाही, ही बाब आवर्जून मांडली, हे विशेष.
६० लाखांसाठी ४० लाखांचा खर्च
शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी तांत्रिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात आले. या सर्वेक्षणांवर ४० लाख रुपये महापालिकेने खर्च केलेत. मात्र मालमत्ता करापोटी केवळ ६० लाख रुपये वसूल झाल्याची आकडेवारी या बैठकीत स्पष्ट झाली.
महापौरांसह राष्ट्रवादीचे सदस्य अनुपस्थित
आ. सुनील देशमुख हे बैठकीसाठी महापालिकेत आले असता महापौर चरणजित कौर नंदा, गटनेता अविनाश मार्डीकर आदी राष्ट्रवादीचे सदस्य अनुपस्थित असल्याचे दिसून आले. काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाइं आदींनी या बैठकीत हजेरी लावली. मात्र राष्ट्रवादी फ्रंटचे सदस्य गैरहजर राहण्यामागे राजकारण असल्याची चर्चा आहे.