मुलांना तृतीयपंथी जाळ्यात अडकविणारी टोळी सक्रिय ?
By Admin | Updated: September 18, 2015 00:22 IST2015-09-18T00:22:09+5:302015-09-18T00:22:09+5:30
अल्पवयीन मुलांना तृतीयपंथी जाळ्यात अडकविणारी टोळी सक्रिय झाली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला दहा दिवसांनंतर तृतीयपंथीयांच्या तावडीतून मुक्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

मुलांना तृतीयपंथी जाळ्यात अडकविणारी टोळी सक्रिय ?
१० दिवसांनंतर ‘त्याची’ सुटका : पालकांची पोलिसांत तक्रार
अमरावती : अल्पवयीन मुलांना तृतीयपंथी जाळ्यात अडकविणारी टोळी सक्रिय झाली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला दहा दिवसांनंतर तृतीयपंथीयांच्या तावडीतून मुक्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तृतीयपंथीयांच्या समूह विस्ताराच्या अनुषंगाने हा प्रकार सुरु असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
जिल्ह्याती एका गावातील रहिवासी असलेला १७ वर्षीय मुलगा अमरावतीत शिक्षणासाठी आला आहे. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत हा मुलगा भाड्याच्या खोलीत राहतोे. ८ सप्टेंबर रोजी येथील जयस्तंभ चौकात खासगी शिकवणीसाठी आलेला हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. या घटनेची माहिती त्याच्या पालकाला ९ सप्टेंबर रोजी मिळाली. ते या घटनेने चक्रावून गेले.
बेपत्ता झालेल्या मुलाचा त्यांनी मित्र, नातवाईकांकडे कसून शोध घेतला. मात्र, त्याचा कोठेही थांगपत्ता लागू शकला नाही. अखेर त्यांनी मुलगा हरविल्याची तक्रार शहर कोतवाली पोलिसात नोंदविली.
त्यानंतर शहर कोतवाली पोलिसांनी त्यादिशेने तपासाची चक्रे फिरवली असता बेपत्ता मुलासोबत संपर्क ठेवून असलेल्यांचा शोध घेण्यात आला. त्याच्या भ्रमणध्वनीवर येणारे कॉल तपासले असता या मुलासोबत तृतीयपंथीयांचा संपर्क आल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यावरून हा अल्पवयीन मुलगा नेमका कोणत्या तृतीयपंथींयांच्या टोळीत गेला असावा, याचा कयास लावून त्याअनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात तृतीयपंथीयांची चौकशी केली. मात्र, हा अल्पवयीन मुलगा आढळला नाही. तरीही हा मुलगा तृतीयपंथीयांच्या जाळ्यात अडकल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते.
दरम्यान मुलाच्या खोलीची तपासणी केली असता तृतीयपंथीय संघटनांशी संबंधित काही जणांचे कागदपत्रे पोलिसांना आढळले. त्यामुळे बेपत्ता मुलगा हा तृतीयपंथीयांच्या जाळ्यात फसला आहे, या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले होते.
त्यामुळे शहर कोतवाली पोलिसांनी बडनेरा रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने तृतीयपंथीयांच्या तावडीतून त्याला मुक्त करण्याची मोहीम सुरू केली. रेल्वे गाड्यात पैसे मागण्यासाठी तृतीयपंथीयांची टोळी चालविणाऱ्या प्रमुखाला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर आठवडाभरापासून बेपत्ता असलेला तो मुलगा गुरूवारी त्याच्या घरी सुखरूप पोहोचला. कदाचित पोलिसांच्या धाकाने तृतीयपंथीयांनी त्याची सुटका केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ बेपत्ता मुलाची पोलिसात नोंद
तृतीयपंथीयांच्या तावडीतून मुक्त करण्यात आलेल्या या मुलाची नोंद शहर कोतवाली पोलिसात करण्यात आली आहे. तसेच आई- वडिलांनी तक्रार दिल्याची नोंद असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. हा युवक तृतीयपंथीयांच्या जाळ्यात अडकला की, स्वत: त्या दिशेने गेला, याबाबत संभ्रम कायम आहे. परंतु तृतीयपंथी समूह हे संख्या वाढीसाठी मुलांना जाळ्यात अडकवितात, असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
बेपत्ता झालेला ‘तो’ अल्पवयीन मुलगा सुखरूप परतला आहे. पोलीस प्रशासनाने तृतीय पंथियांशी निगडित एका क्लबचे कार्ड सदर युवकाच्या खोलीत आढळल्याने त्या दिशेने तपास चालविला होता. यात पोलीस यशस्वी झाले. मात्र तो कोठे होता, कसा होता हे सांगण्यास या मुलाने नकार दिला आहे.
- दिलीप पाटील,
पोलीस निरीक्षक, शहर कोतवाली.