चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST2021-03-24T04:12:34+5:302021-03-24T04:12:34+5:30
चांदूर रेल्वे : तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, तालुक्यातील प्रशासन ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक ...

चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कारवाई
चांदूर रेल्वे : तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, तालुक्यातील प्रशासन ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक दुकानदार व्यावसायिकांना कोविड चाचणी सक्तीची केली असून, २५ मार्चपर्यंत चाचणी न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्या मार्गदर्शनात २२ मार्च रोजी झालेल्या बैठकीत तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी या सूचना दिल्या. चाचणी सुलभ व्हावी, यासाठी २४ मार्च रोजी दुपारी १ ते ४ पर्यंत व्यावसायिकांसाठी विशेष कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही तहसीलदारांनी सांगितले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी कोवे, महिला बाल विकास अधिकारी वैशाली ढगे, गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर उपस्थित होते.
तालुक्यात २१ मार्च रोजी २० कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यासोबत शहरातील कोरोना चाचणी वाढविण्याचे प्रयत्न प्रशासन करीत आहे. या शिबिरात कोणालाही चाचणी करून घेता येईल. ग्रामीण रुग्णालयात दररोज सकाळी ९ ते १२ या वेळात चाचणी सुरू असल्याचे आरोग्य अधिकारी कोवे यांनी सांगितले, तर २५ मार्चपर्यंत तालुक्यातील सर्व व्यावसायिकांनी कोविड चाचणी करून त्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवावे, असे आवाहन तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी केले. त्यानंतर सर्व दुकानांना भेट देऊन चाचणी प्रमाणपत्र तपासण्यात येणार असून, प्रमाणपत्र नसणाऱ्या दुकानावर नाइलाजाने दंडात्मक कारवाई करावी लागणार असल्याचेही सांगण्यात आले.