निवासी क्षेत्रातील वाणिज्य वापरावर होणार कारवाई
By Admin | Updated: July 24, 2015 00:18 IST2015-07-24T00:18:50+5:302015-07-24T00:18:50+5:30
निवासी क्षेत्रातील इमारतींचा वाणिज्य वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

निवासी क्षेत्रातील वाणिज्य वापरावर होणार कारवाई
दुप्पट कर, दंड वसुली : ३१ आॅगस्टपर्यंत नियमित करुन घेण्याचे आवाहन
अमरावती : निवासी क्षेत्रातील इमारतींचा वाणिज्य वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. याबाबत संबंधितांना नोटीस बजावून वाणिज्य वापर केल्याप्रकरणी दुप्पट कर आणि दंड वसूल करण्याची मोहीम राबविली जाणार आहे. ३१ आॅगस्टपर्यंत ही संधी असून त्यानंतर वाणिज्य वापर करणाऱ्यांवर महापालिका अधिनियमानुसार कारवाई होईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.
नवीन व अतिरिक्त बांधकामांची शोधमोहीम राबवून त्यांच्यावर कर आकारणीचा मुद्दा शमत नाही तोच निवासी क्षेत्रात वाणिज्य वापर करणाऱ्या मालमत्तांचा शोध घेतला जात आहे. पाचही झोनमध्ये अशा मालमत्ता शोधण्याचे निर्देश आयुक्तांनी सहायक आयुक्तांना दिले आहेत.
पत्रकांचे वाटप करून ध्वनीक्षेपकाद्वारे देणार माहिती
निवासी क्षेत्रात वाणिज्य वापर करणाऱ्या मालमत्ताधारकांनी मुंबई महापालिका अधिनियमानुसार नियमित कार्यवाही करून घेण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पत्रकांचे वाटप केले जाईल. ध्वनीक्षेपकावरून दुप्पट कर आणि दंडात्मक रक्कम भरण्याबाबतच्या सूचना दिल्या जातील. ३१ आॅगस्टपर्यंत ही संधी राहणार असून त्यानंतर प्रशासन नियमानुसार कारवाई करणार, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
अमरावतीचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश करण्यासाठी उत्पन्नात वाढ करावी लागेल. त्यामुळे आता निवासी क्षेत्रात वाणिज्य वापर करून व्यवसाय करणाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- चंद्रकांत गुडेवार,
आयुक्त, महापालिका.