विद्यार्थ्यांना नववीत नापास करणाऱ्या शाळांवर कारवाई
By Admin | Updated: March 27, 2016 00:09 IST2016-03-27T00:09:46+5:302016-03-27T00:09:46+5:30
गेल्या दोन वर्षांतील नववी व दहावीच्या निकालाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने माध्यमिक शाळांना दिले आहेत.

विद्यार्थ्यांना नववीत नापास करणाऱ्या शाळांवर कारवाई
बडगा : दोन वर्षांचा अहवाल मागविला
अमरावती : गेल्या दोन वर्षांतील नववी व दहावीच्या निकालाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने माध्यमिक शाळांना दिले आहेत. नववीचा निकाल कमी करून दहावीचा निकाल अधिक दाखविणाऱ्या शाळांना शिक्षण विभागाद्वारा कारणे दाखवा नोटीस बजावणार आहेत. तसेच नववीमध्ये विद्यार्थ्यांना नापास करून दहावीला निकालाची टक्केवारी वाढविणाऱ्या शाळांवर शिक्षण विभाग कारवाई करणार आहे.
नववीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्याच्या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शाळा सोडण्याचे प्रमाण पहिली ते आठवीच्या वर्गाच्या तुलनेत अधिक असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनात आले आहे. नववीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी लक्षात घेऊन व दहावीच्या निकालाची टक्केवारी निश्चित करून त्या शाळांची गुणवत्ता विचारात घेतली जाणार आहे.
एखाद्या शाळेत २०० विद्यार्थी इयत्ता नववीत शिकत असतील व त्या शाळेतील १०० विद्यार्थी हे दहावीच्या परीक्षेला बसले आहेत आणि हे सर्व १०० ही विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. याचा अर्थ १०० टक्के निकाल लागला, असे गृहित धरण्यात येते. परंतु आता नववीतील २०० विद्यार्थी गृहित धरून दहावीचा निकाल ५० टक्के लागला असे मानण्यात येऊन व त्यानुसारच शाळेची गुणवत्ता मानण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक कार्यालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)