अडीच हजार उमेदवारांवर होणार अपात्रतेची कारवाई
By Admin | Updated: October 9, 2015 00:44 IST2015-10-09T00:44:07+5:302015-10-09T00:44:07+5:30
जिल्ह्यात मे ते सप्टेंबर २०१५ दरम्यान झालेल्या ५३१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या दोन हजार ६०२ उमेदवारांनी...

अडीच हजार उमेदवारांवर होणार अपात्रतेची कारवाई
लोकमत विशेष
गजानन मोहोड अमरावती
जिल्ह्यात मे ते सप्टेंबर २०१५ दरम्यान झालेल्या ५३१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या दोन हजार ६०२ उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा तपशील अद्याप तहसीलदारांसमक्ष सादर केला नाही. या उमेदवारांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्याची कारवाई केली जाणार आहे. यामुळे हे अडीच हजार उमेदवारांना त्यांचे सदस्यत्व गमवावे लागणार असून पाच वर्षांपर्यंत निवडणूकही लढविता येणार नाही. ही प्रकरणे प्रक्रियेत असून ती तीन महिन्यांच्या आत निकाली काढण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात मे ते जुलै व जुलै ते सप्टेंबर या दोन टप्प्यात ५३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ३२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका पार पडल्यात. या निवडणुका लढविणाऱ्या १० हजार ३८७ उमेदवारांपैकी ७ हजार ७८५ उमेदवारांनी आयोगाद्वारे निर्देशित अधिकाऱ्यांकडे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत शपथपत्राद्वारे निवडणूक खर्च सादर केला.
परंतु २ हजार ६०२ उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा खर्च २२ मे २०१५ या अंतिम तारखेपर्यंत व दुसऱ्या टप्प्यातील ग्रापं निवडणुकीचा खर्च सादर करण्याच्या २७ जुलै २०१५ या अंतिम तारखेच्या आत सादर केला नाही. परिणामी या उमेदवारांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून कायम राहण्यास किंवा पुन्हा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह ठरविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
याच आठवड्यात अमरावती तालुक्यातील ७० उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याचे शिक्कामोर्तब जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.