निधी अखर्चित राहिल्यास विभागप्रमुखांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:20+5:302021-02-05T05:28:20+5:30

अमरावती : जिल्हा नियोजनात नमूद कामे विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. पूर्वनियोजनात काही बदल आवश्यक असेल, तर १४ ...

Action against department heads if funds remain unspent | निधी अखर्चित राहिल्यास विभागप्रमुखांवर कारवाई

निधी अखर्चित राहिल्यास विभागप्रमुखांवर कारवाई

अमरावती : जिल्हा नियोजनात नमूद कामे विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. पूर्वनियोजनात काही बदल आवश्यक असेल, तर १४ फेब्रुवारीपूर्वी निधीसाठीचे परिपूर्ण नियोजन सादर करावे. त्यानंतर मात्र प्राप्त निधीतून सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. निधी अखर्चित राहता कामा नये, अन्यथा विभागप्रमुखांवर कारवाई केली जाईल, अशी तंबी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे दिली.

जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर ना. ठाकूर यांनी पत्रपरिषदेतून डीपीसीत झालेल्या विविध निर्णयाची माहिती

दिली. यावेळी प्राथमिक आराेग्य केंद्राच्या बळकटीकरणास प्राधान्य देण्यात आले असून, ग्रामीण, शहरी भागासाठी २२ कोटी रुपये निधींची तरतूद केली आहे. कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीला निधीत काही प्रमाणात कपात करण्यात आली होती. मात्र, ‘मिशन बिगेन अगेन’नंतर ती वाढविण्यात आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार यंदा २१९ कोटी १८ लाख रुपये प्रस्तावित नियतव्यय आहे. आदिवासी क्षेत्रातील उपयोजनांसाठी ७८ कोटी व सामाजिक न्याय योजनांसाठी १०१ कोटी रुपयांची तरतूद आहे. गतवर्षी २७१ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर होता. त्याप्रमाणे सर्व विभागांकडून विहित वेळेत पूर्ण होणाऱ्या आवश्यक कामांचे प्रस्ताव प्राप्त करून घेऊन निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. मात्र, निधी अखर्चित राहिल्यास ती संबंधित विभागप्रमुखाची जबाबदारी असेल. त्यामुळे सर्व विभागांनी परिपूर्ण नियोजन १४ फेब्रुवारीपूर्वी देण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील जलप्रकल्प व तेथील नैसर्गिक संपदा लक्षात घेता, ‘इनलँड वॉटर टुरिझम’वर भर देण्यात येईल. जिल्ह्यात गारमेंट हब निर्माण करण्याचेही नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक निधी देऊ, असेही त्यांनी सांगितले.

०पत्रपरिषदेला आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, धारणीच्या प्रकल्प अधिकारी मिताली सेठी आदी उपस्थित होते.

------------------------------------------

जिल्ह्यात नव्याने ३०० ट्रान्सफॉर्मर लागणार

नियमित वीजपुरवठ्यासाठी महावितरणने सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवून कामे करावीत. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार थांबावेत, याबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करावी. ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मरबाबत १५ मार्चपूर्वी आवश्यक दुरुस्ती किंवा नवी यंत्रणा कार्यान्वित करावे. सुरळीत विजेसाठी २५० ते ३०० नवे ट्रान्सफॉर्मर लागणार आहेत. त्यासाठी निधी देण्यात येईल. ‘ट्रान्सफॉर्मर ऑन व्हील’ ही संकल्पना राबवून नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलून पुरवठा सुरळीत करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाईल, असेही पालकमंत्री ठाकूर यांनी सांगितले. कृषिपंपासाठी शासनाने हितकारी धोरण अंमलात आणले आहे. त्याचा लाभ अधिकाधिक शेतकरी बांधवांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

-------------------------

पांदणर स्त्यांसाठी विशेष मॉडेल

पालकमंत्री ठाकूर यांनी चांगले पांदण रस्ते नसते, तर शेतकरी बांधवांना त्रास होतो. हे लक्षात घेऊन पांदण रस्ते योजनेचे जिल्ह्यासाठी विशेष मॉडेल अंमलात आणले जाईल. कन्व्हर्जनमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हा नियोजन, मनरेगा, जिल्हा परिषद, आमदार निधीतूनही कामे राबविण्यात येतील. चिखलदरा येथील सिडको प्रकल्पाचे काम मार्गी लागण्यासाठी सतत पाठपुरावा होत आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: तिथे भेट देऊन आढावा घेणार आहेत.

------------------------

आमझरी होणार ‘मँगो व्हिलेज’

जिल्ह्यातील आमझरी हे ‘मँगो व्हिलेज’ म्हणून विकसित करण्यात येईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. संत गाडगेबाबा निर्वाणभूमी, वलगाव येथे जिल्ह्यातील प्राचीन, ऐतिहासिक बाबींची माहिती देणारे प्रदर्शन व संग्रहालय उभारण्यात येईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवनचरित्र नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेकडून विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहे. माझी वसुंधरा उपक्रमात सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यात पंचायत समित्या, पालिका या ठिकाणी इमारतींवर सौरऊर्जा यंत्रणा बसवून त्यांना ऊर्जावापराबाबत स्वयंपूर्ण करण्यात येईल.

----------------------

Web Title: Action against department heads if funds remain unspent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.