२९ गावांची भिस्त विहीर अधिग्रहणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:58+5:302021-04-11T04:12:58+5:30
अमरावती : जिल्ह्यातील २९ गावांना ३२ विहिरी अधिग्रहीत करून पाणीपुरवठा केला जात आहे. चिखलदरा तालुक्यातील एकझिरा व लवादा या ...

२९ गावांची भिस्त विहीर अधिग्रहणावर
अमरावती : जिल्ह्यातील २९ गावांना ३२ विहिरी अधिग्रहीत करून पाणीपुरवठा केला जात आहे. चिखलदरा तालुक्यातील एकझिरा व लवादा या दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
गतवर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाणीपुरवठ्याच्या जलस्रोतांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात असल्याने अनेक तालुक्यांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईची झळ कमी सोसावी लागण्याची शक्यता वर्तविली जात होती. तरीदेखील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाईने डोके वर काढले आहे.
जिल्ह्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवली आहे. या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांनी तळ गाठला आहे. परिणामी प्रशासनाने आजघडीला १४ पैकी ७ तालुक्यांतील २९ गावांमध्ये गत मार्च महिन्यापासून ३२ विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा केला आहे. अधिग्रहीत विहिरी व बोअरवरून या गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. शहरातदेखील एक ते दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. संभाव्य पाणीटंचाई पाहता, त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या २९ गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले तसेच ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करताच पंचायत समितीच्यावतीने विहिरी व बोरवेल अधिग्रहणाची कार्यवाही केली आहे.
बॉक्स
विहीर व बोअरचे अधिग्रहण झालेले गावे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा, शेलूगुंड, पळसमंडळ, नागझरी, बोपी, पिंप्री गावंडा, चिखलदरा तालुक्यातील एकझिरा, लवादा, अमरावती तालुक्यातील भानखेडा, माेगरा,कस्तुरा, यावली अंतर्गत नरसिंगपूर, इंदला, मौजे घातखेडा, बोडणा(परसोडा), देवरा, चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा, नया सावंगा, निमला, अमदोरी, टेंभूर्णी, भातकुली तालुक्यातील दाढी पेढी, अचलपूर तालुक्यातील बोर्डी, वाल्मीकपूर, खतिजापूर, कासमपूर, कुंभी वाघोली, कुष्ठा बु.,परसापूर आदी गावांमध्ये विहिरी व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले.
बॉक्स
दोन गावांना टँकरचा आधार!
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात सद्यस्थितीत एकझिरा व लवादा या गावांत पाणीपुरवठ्याची समस्या तीव्र झाली असल्याने, या ठिकाणी दोन टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. बाहेर ठिकाणाहून पाणी आणून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे.