अचलपूर तालुका तापाने फणफणतोय
By Admin | Updated: September 27, 2014 00:57 IST2014-09-27T00:57:17+5:302014-09-27T00:57:17+5:30
गेल्या तीन-चार वर्षांपासून अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यात विषाणूजन्य तापाची साथ पसरली आहे.

अचलपूर तालुका तापाने फणफणतोय
सुनील देशपांडे अचलपूर
गेल्या तीन-चार वर्षांपासून अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यात विषाणूजन्य तापाची साथ पसरली आहे. डेंग्यूसदृश, स्वााईन फ्लूसदृश्य, मलेरीया, कावीळ, टायफाइड, सर्दी, ताप, खोकला या आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे खासगी दवाखाने रुग्णांनी हाउसफूल्ल झाले आहे.
अस्वच्छता आणि दूषित पाण्यामुळे तापाच्या साथीला निमंत्रण मिळत आहे. अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. अचलपूर-परतवाडा शहरात घाण व कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. डासांचा उपद्रव वाढला आहे. कचरा टाकण्यासाठी वार्डांमध्ये कंटनेर नसल्याने रस्त्यात कुठेही कचरा टाकला जात असून पावसामुळे तो ओला होऊन त्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील सांडपाण्याच्या नाल्या तुंबणे ही नित्याची बोंब असून नाल्यांवर जंतूनाषक औषधाची फवारणी केली जात नाही. गेल्या कित्येक दिवसापासून वार्डावार्डत फिरणाऱ्या घंटागाड्याही फिरतांना दिसत नाहीत. नगरपालिकेचा आरोग्य विभाग अजूनही निद्रावस्थेत आहे काय? नगरसेवक काय करत आहेत? ते प्रशासनाला धारेवर धरु शकत नाही काय, असे संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केले आहेत.
विषाणुजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज ३०० पेक्षा जास्त बाह्य रुग्णांची नोंद होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी मेराज अली यांनी दिली. उपजिल्हा रुग्णालयात असलेली अस्वच्छता, शौचालयातील घाण, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा उध्दटपणा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची बोलण्याची पद्धत व औषधीची कमतरता यासह विविध कारणांमुळे रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असून खासगी दवाखाने हाऊसफूल्ल झाले आहेत.
अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक दिसत नाही. गावात सांडपाण्याच्या गटारी वाट मिळेल तिकडे जाते. अनेक ठिकाणी साचलले डबके, उकिरडे यावर उपाययोजना होत नसून गटविकास अधिकारीही याकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
तालुक्यात डेंग्यू सदृश, स्वाईन फ्लू सदृश, मलेरिया, कावीळ, टायफाइड याचे रुग्ण यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या रुग्णाच्या नोंदी भलेही शासकीय रुग्णालयात नसतील मात्र खासगी रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडे जवळपास सर्वच आजारावर लस उपलब्ध होऊ शकते. पण तालुका आरोग्य अधिकारी याबाबत ढिम्म असल्याचे रुग्ण सांगतात. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.डी.एम. खरात असताना ग्रामीण भागात आलेल्या साथीची तत्काळ दखल घेतली जात होती. त्यांची येथून बदली झाल्यापासून तालुका आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागात पावसाळ्याच्या दिवसांत कर्मचारी व औषधी अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. कारण कोणता रोग केव्हाही अचानक उद्भवू शकतो. मात्र शासकीय सेवा येथे थिटी पडत आहे.