अचलपूर पंचायत समितीवर प्रहारची सत्ता ?
By Admin | Updated: April 28, 2016 00:07 IST2016-04-28T00:07:39+5:302016-04-28T00:07:39+5:30
अचलपूर पंचायत समितीवर प्रहारचा सभापती व काँग्रेसचा उपसभापती अशी सत्ता येण्याची चिन्हे आहे.

अचलपूर पंचायत समितीवर प्रहारची सत्ता ?
परतवाडा : अचलपूर पंचायत समितीवर प्रहारचा सभापती व काँग्रेसचा उपसभापती अशी सत्ता येण्याची चिन्हे आहे. विद्यमान सभापती सोनाली प्रशांत देशमुख यांनी २६ एप्रिल रोजी पक्ष श्रेष्ठींना राजीनामा दिल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. तर, दुसरीकडे सव्वा वर्षाचा समझोता प्रहार व काँग्रेसमध्ये सभापती पदावरुन झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अचलपूर पंचायत समितीच्या सभापती सोनाली प्रशांत देशमुख यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा माजी आ.केवलराम काळे यांच्याकडे दिला आहे. पंचायत समिती वर्तुळात पाच कॉंग्रेस, चार प्रहार व एक भाजप अशी सदस्य संख्या आहे. सव्वा वर्षांपूर्वी काँग्रेस व प्रहारची युती झाली होती. सभापतीपदी काँग्रेसच्या सोनाली प्रशांत देशमुख तर उपसभापतीपदी प्रहारचे गजानन मोरे यांची अविरोध निवड करण्यात आली होती. हे विषेश.
काँग्रेसने शब्द पाळला !
सभापती पदावर आरुढ होतांना काँग्रेस व प्रहारमध्ये प्रत्येकी सव्वा वर्षाचा समझोता सभापती पदासाठी झाला होता. त्यानुसार काँग्रेस पक्षाच्या सभापती पदावर आरुढ असलेल्या सोनाली देशमुख यांनी कुठलाही लोभ न बाळगता करारानुसार स्वत:हून पक्ष श्रेष्ठींकडे राजीनामा दिला. आता माजी आ. केवलराम काळे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यात बैठक झाल्यावर पुढील राजकीय खेळी ठरणार आहे.
प्रहारची सत्ता येणार !
अचलपूर पंचायत समिती सभापतीपद महिलांच्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. प्रहारच्या चार सदस्यांमध्ये मिनाक्षी ठाकरे व माजी उपसभापती प्रिती घाडगे या महिला सदस्या आहेत. करारानुसार सभापतीपदी कोण विराजमान होणार यावर बुधवार पासून अंतर्गत चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे काळपर्यत सभापती पदावर आरुढ काँग्रेसमध्ये उपसभापती पदावर चर्चा झाली आहे.
दहा महिण्याचे सभापती
सभापतीचा कार्यकाळ आता केवळ दहा महिन्याचा शिल्लक राहीला आहे. अशातच पुढे निवडणुकीचे वारे वाहू लागणार असतांना काँग्रेस पक्षश्रेष्ठी कुठला निर्णय याकडे सर्वांचे लक्ष आहे.