यशवंत पंचायत राज अभियानात अचलपूर, दर्यापूर पंचायत समित्यांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST2021-03-13T04:24:21+5:302021-03-13T04:24:21+5:30
अमरावती : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामविकास मंत्र्यांनी राज्यस्तरीय व विभाग स्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद पंचायत समित्याचे पुरस्कार घोषित ...

यशवंत पंचायत राज अभियानात अचलपूर, दर्यापूर पंचायत समित्यांची बाजी
अमरावती : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामविकास मंत्र्यांनी राज्यस्तरीय व विभाग स्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद पंचायत समित्याचे पुरस्कार घोषित केले. यात अमरावती विभागात अचलपूर पंचायत समिती प्रथमक तर, दर्यापूर द्वितीय आणि यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तृतीय पुरस्कार पटकाविला आहे.
यशवंत पंचायत राज अभियान सन २०२०-२१ (मूल्यांकन वर्ष २०१९-२०) अंतर्गत हे पुरस्कार आहेत. दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी १२ मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा या दिवशी हा कार्यक्रम होणार नाही. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यातील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यात पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना विभागस्तर व राज्यस्तरावर "यशवंत पंचायत राज अभियान" पुरस्कार देण्यात येतात. ग्रामपंचायतींसाठी स्मार्ट ग्राम व्हिलेज योजनेंतर्गत पुरस्कार देण्यात येतात. यशवंत पंचायत राज पुरस्कार निवड करण्यासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पारितोषिक निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. तसेच राज्यस्तरीय पारितोषिक निवड समितीच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालयांची अदलाबदल करून क्षेत्रिय पडताळणी करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील दोन पंचायत समित्यांनी बाजी मारली आहे.
बॉक्स
असे मिळणार पारितोषिक
यशवंत पंचायत राज अभियानात विभागात बाजी मारलेल्या अचलपूर पंचायत समितीला ११ लाख, दर्यापूरला ८ आणि राळेगाव पंचायत समितीला ६ लाख रुपयांचा रोख पुरस्कार तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे.