विक्की हत्याप्रकरणात आरोपीस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST2021-05-05T04:21:51+5:302021-05-05T04:21:51+5:30
परतवाडा : स्थानिक छोटा बाजारमध्ये घडलेल्या हत्याकांडातील आरोपीस अचलपूर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर मृतक ...

विक्की हत्याप्रकरणात आरोपीस पोलीस कोठडी
परतवाडा : स्थानिक छोटा बाजारमध्ये घडलेल्या हत्याकांडातील आरोपीस अचलपूर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर मृतक विक्की पवार याच्या मृतदेहावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोमवार दिनांक ३ मे रोजी भरदिवसा दुपारी ४ वाजताच्या दरम्यान विक्की पवार (३२, रा. रविनगर, परतवाडा) याची आरोपीने हत्या केली. यात पोलिसांनी आरोपी शेख मुराद शेख इस्माईल (रा. छोटा बाजार) याच्या विरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास सायंकाळीच अटक केली.
मंगळवार ४ मे रोजी आरोपीस अचलपूर न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मृतकाचा भाऊ राज पवार याने घटनेनंतर परतवाडा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यात आरोपी मुराद बिल्डर व त्याच्या सोबतच्या इसमांनी पैशांबाबत वाद घालून विक्कीस मारहाण करीत चाकूने भोसकून ठार केल्याचे म्हटले आहे. ही मारहाण पेन्शनपुरा येथील तुषार यादव यांच्या डोळ्यादेखत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मृतक अचलपूर नगर परिषदेतील सफाई कामगार आहे. त्याच्या मृतदेहावर मंगळवार ४ मे रोजी चोख पोलीस बंदोबस्तात परतवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेच्या दुसऱ्या दिवशीही शहरात ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.
दरम्यान, दुचाकीचा धक्का लागल्यावरून झालेल्या शाब्दिक चकमकीतून रागाच्या भरात ही घटना घडली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.