लग्नासाठी ११ वर्षे झुलवणाऱ्या आरोपीला ६ महिने सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 13:04 IST2021-02-06T13:04:24+5:302021-02-06T13:04:49+5:30
Amravati News महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन टाळाटाळ केल्याप्रकरणी आरोपीला परतवाडा स्थानिक न्यायालयाने ६ महिने सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

लग्नासाठी ११ वर्षे झुलवणाऱ्या आरोपीला ६ महिने सक्तमजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन टाळाटाळ केल्याप्रकरणी आरोपीला परतवाडा स्थानिक न्यायालयाने ६ महिने सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रफुल्ल दामोधरपंत धर्माळे (रा.चमक, ता. अचलपूर) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ ए.ए.सईद यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
विधी सूत्रानुसार, २ आॅक्टोबर २००९ रोजी ही घटना घडली. घटनेवेळी पिडिता तिच्या आजारी बहिणीसोबत अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात गेली असता तेथील वॉर्डबॉय प्रफुल्ल धर्माळे याने तिला लग्नाचे खोटे आमीष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर लग्नास नकार दिला. अचलपूर पोलिसांनी त्यावेळी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ४१७, ५०६ व अॅट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपासी अधिकारी पी. एस. माहुरे यांनी तपास करून दोषारोप पत्र विद्यमान न्यायालयात दाखल केले.
न्यायालयाने भादंविचे कलम ३७६ मधून आरोपीस मुक्त करून कलम ४१७, ५०६ व अॅट्रॉसिटीअन्वये आरोपीला दोषी ठरविले. सहा.सरकारी वकील जी. ए. विचोरे यांनी २२ साक्षाीदार तपासले.युक्तीवादाअंती न्यायालयाने आरोपीला कलम ४१७ मध्ये ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. १० हजार रुपये दंड केला तसेच दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा ठोठावली. तसेच पिडीताला २० हजार रुपये नुकसान भरपाईचा आदेश दिला. न दिल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात सुरेश गि-हे यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.