लॉकअपमधून पळालेला आरोपी तीन तासांत गजाआड
By Admin | Updated: May 21, 2016 00:11 IST2016-05-21T00:11:01+5:302016-05-21T00:11:01+5:30
घरफोडीच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपी कुलदिपसिंग जुनी याने शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील लॉकअपमधून शुक्रवारी सायंकाळी ५.२० पलायन केले.

लॉकअपमधून पळालेला आरोपी तीन तासांत गजाआड
शहरात नाकाबंदी : पोलीस वर्तुळात खळबळ
अमरावती : घरफोडीच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपी कुलदिपसिंग जुनी याने शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील लॉकअपमधून शुक्रवारी सायंकाळी ५.२० पलायन केले. रात्री ८ वाजताच्या सुमारास पुन्हा आरोपीला बडनेरा येथे अटक करण्यात आली. त्यामुळे आरोपीच्या नाट्यावर अखेर पडदा पडला. मात्र, या घटनेने पोलीस वर्तळात खळबळ उडाली आहे.
आरोपी कुलदीपसिंग दर्शनसिंग जुनी (३०, रा. नागपूर) याला गुन्हे शाखेने १५ दिवसांपूर्वी नागपूर येथून अटक केली. चौकशीत त्याने १५ घरे फोडल्याची कबुली दिली. त्याच्याजवळून २४५ ग्रॅमचे सोन्याचे दागिनेसुध्दा जप्त करण्यात आले. तूर्तास तो गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र, तेथे लॉकअप नसल्यामुळे त्याला कोतवालीच्या लॉकअपमध्ये ठेवले होते. शुक्रवारी सायंकाळी ५.२० वाजता आरोपीने लॉकअपमधील शौचालय स्वच्छ करण्यासाठी तैनातीस असलेल्या पोलीस कर्मचारी दिनेश वानखडे सांगितले. त्यांनीही दरवाजा उघडून शौचालयात पाणी टाकले. दरम्यान आरोपी जुनी याने वानखडे यांना धक्का देऊन तो लॉकअप बाहेर पलायन केले. आरोपीने ठाण्याच्या मागील बाजूस असणाऱ्या बापट चौकाकडे धूम ठोकली. ही घटना लक्षात येताच पोलिसांची भंबेरी उडाली. घटनेचीी माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके आणि रियाजुद्दीन देशमुख यांनी कोतवाली गाठून सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यात पोलीस कर्मचारी दिनेश वानखडे यांना धक्का देऊन आरोपी जूनी याने पळ काढल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान त्याला शोधण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला बडनेरावरून अटक केली.
गुन्हे शाखेने आरोपीला केली बडनेऱ्यातून अटक
लॉकअपमधून आरोपी जुनी याने पलायन केल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. दरम्यान गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या नेत्तृत्वात पीएसआय साबीर शेख, एएसआय दिलीप वाघमारे, पोलीस शिपाई प्रवीण सूर्यवंशी, अक्षय देशमुख, अशोक वाटाणे व अमोल खंडेझोड यांनी दोन तासात आरोपीच्या सर्व नातेवाईकांना गाठून विचारपूस सुरु केली. त्यावेळी जुनी हा बडनेरात असल्याचे कळले. गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ बडनेरा गाठून आरोपीची शोधाशोध सुरु केला. तेव्हा बडनेरातील पाणी टाकीजवळून जुनी याला पोलिसांनी अटक केली.