अपघातप्रकरणातील आरोपीला अडीच वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST2021-04-11T04:13:01+5:302021-04-11T04:13:01+5:30
मोर्शी : तालुक्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेहगाव ते वाघोली रोडवरील एका शेताजवळ २३ एप्रिल २०१५ ला ...

अपघातप्रकरणातील आरोपीला अडीच वर्षे सक्तमजुरी
मोर्शी : तालुक्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेहगाव ते वाघोली रोडवरील एका शेताजवळ २३ एप्रिल २०१५ ला झालेल्या अपघातप्रकरणी आरोपी दिवाकर लक्ष्मणराव गोंडाणे (५६, रा. मुंबई दहिसर) याला स्थानिक न्यायालयाने अडीच वर्षे सक्तमजुरी व ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
नकुल बाबुराव तायवाडे (७२, रा. वाघोली) यांनी याबाबत तक्रार नोंदविली होती. घटनेच्या वेळी एमएच १५ बी.एन. ६७६६ क्रमांकाचे वाहन चालक दिवाकर गोंडाणे याने भरधाव व हलगर्जीपणाने चालवून ऑटोरिक्षाला धडक दिली. यात प्रवासी छबू महादेव लुंगे यांचा मृत्यू झाला, तर इतर जखमी होऊन ऑटोरिक्षाचे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. ३१ मार्च रोजी अंतिम युक्तिवाद झाला. आरोप सिद्ध झाल्याने दिवाकर गोंडाणे याला भादंविचे कलम २७९ अन्वये तीन महिने सक्तमजुरी, कलम ३३७ अन्वये तीन महिने सक्तमजुरी, कलम ३३८ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व कलम ३०४ (अ) अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व ४५ हजार रुपये नुकसानभरपाईची शिक्षा न्यायाधीश जे.जे. वाघ यांनी सुनावली. सरकारी वकील यू.आर. बारब्दे होते. तपास अंमलदार दीपक उईके होते. कोर्ट पैरवीचे काम हेडकॉन्स्टेबल संतोष बावणे यांनी पाहिले.
-----------------