लेखा विभागात लेखणीबंद
By Admin | Updated: March 16, 2017 00:10 IST2017-03-16T00:10:23+5:302017-03-16T00:10:23+5:30
न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा परिषद प्रशासनद्वारा होत नसल्याचा आरोप करुन बुधवारी वित्त व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले.

लेखा विभागात लेखणीबंद
आंदोलन : जिल्हा परिषदेत आर्थिक व्यवहाराची कोंडी
अमरावती : न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा परिषद प्रशासनद्वारा होत नसल्याचा आरोप करुन बुधवारी वित्त व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. त्यानंतर आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे एकच खळबळ उडाली.
केंद्र व राज्य शासनाच्या किमान ३५० योजनेसह १५ हजार कर्मचाऱ्यांचे आस्थापना विषयक बाबी, लेखा विभागातील अधिकारी व कर्मचारी राबवित आहे. लेखा विभागातील कर्मचाऱ्यांशी निगडीत प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी न्यायालयाने योग्य ते आदेश दिले आहे. परंतु प्रशासनाने याबाबत कार्यवाही केली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मिनीमंत्रालयातील आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनिष पंचगाम, कार्याध्यक्ष सतीश माळवे, सचिव प्रज्वल घोम यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दारसमोर विविध मागण्यासाठी निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधले.
लेखा कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्हा सेवा वर्ग (२) वगर् (३) लेखा श्रेणी- १ मध्ये असलेले पद सहायक लेखा अधिकारी यांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, ग्रेड पे मिळावे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व इंदिरा आवास योजनेतंर्गत पंचायत समितीस्तरावर सहायक लेखा अधिकारी पद निर्माण करावे, लेखा लिपीक परीक्षा उपलेखापाल परीक्षा व लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वित्त व लेखा (जि.प.) सेवा वर्ग ३ ची परीक्षा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे स्पर्धा परीक्षा जाहीर करावी, जिल्हा परिषदेतील लेखा संवर्गीय कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लेखाधिकारी तसेच सहायक लेखाधिकारी पदावर पदोन्नती देण्यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना प्रमाणे प्रशिक्षण द्यावे. अशा विविध मागण्यासाठी १५ मार्च पासून जिल्हा परिषद लेखा कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनात मनिष पंचगाम, सतीश माळवे, प्रज्वल घोम, अनुप सोलिव, अशोक भिलकर, विनोद रायबोले, लक्ष्मण राठोड, अजित रामेकर, उज्वला भोवते, ललिता हरणे, विजेंद्र दिवाण, शहा, राजेंद्र हूड, विकल मेहरा, प्रशांत नेवारे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)