वॉटर बजेटनुसार गावे टंचाईमुक्त करा
By Admin | Updated: February 1, 2016 00:09 IST2016-02-01T00:09:59+5:302016-02-01T00:09:59+5:30
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत समितीमार्फत तयार केलेल्या वॉटर बजेटनुसारच निवडलेली गावे टंचाईमुक्त करावीत, ...

वॉटर बजेटनुसार गावे टंचाईमुक्त करा
पालकमंत्री : आढावा बैठकीत मार्गदर्शन
अमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत समितीमार्फत तयार केलेल्या वॉटर बजेटनुसारच निवडलेली गावे टंचाईमुक्त करावीत, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मधील पूर्ण झालेल्या कामाचा तसेच प्रगतीपथावरील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी किरण गीत्ते, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी काळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक कराड, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. सन २०१६ या वर्षासाठी जलयुक्त शिवार अभियानाखाली ४१० गावांची निवड केली आहे. जिल्ह्यातील सर्व टंचाई गावात जलयुक्त शिवार योजनेची कामे घ्यावीत असे सांगून पालकमंत्री म्हणाले टंचाईमुक्त गावे करण्यासाठी शासन ज्या गांभीर्याने निर्णय घेत आहे त्यानुसारच अपेक्षित कामे पूर्ण करावी. ज्या कंत्राटदारांनी पूर्वीची कामे पूर्ण केलेली नाहीत त्यांना नवीन कामे देऊ नये, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी किरण गीत्ते म्हणाले की, जिल्ह्यात २०१६ साठी ४१० गावांची निवड झाली आहे. यामध्ये अमरावती-२५, भातकुली-३८, नांदगाव खंडेश्वर-३५, चांदूर रेल्वे-२०, धामणगाव रेल्वे-१७, तिवसा-१३, मोर्शी-२२, वरुड-२९, अचलपूर-३१, चांदूर बाजार-३१, दयार्पूर-२४, अंजनगाव सुर्जी-३१, धारणी-४२, चिखलदरा-५२ या गावांचा समावेश आहे.