शिक्षण सभापतींची शाळांना आकस्मिक भेट, मुख्याध्यापकासह शिक्षक गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST2021-04-07T04:13:26+5:302021-04-07T04:13:26+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर यांनी सोमवारी धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन शाळांना आकस्मिक भेटी ...

शिक्षण सभापतींची शाळांना आकस्मिक भेट, मुख्याध्यापकासह शिक्षक गैरहजर
अमरावती : जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर यांनी सोमवारी धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन शाळांना आकस्मिक भेटी दिल्या. या भेटीदरम्यान मुख्याध्यापकास सर्व शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले. या गैरहजर शिक्षकांवर कारवाई करण्याबाबत लेखी पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांना दिले आहे.
कोरोनामुळे राज्य शासनाने ऑफलाईन शाळा बंद केल्या असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याचे आदेश दिले आहेत. ऑनलाईन शिक्षण असले तरी मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना नियमाप्रमाणे वेळेत शाळेत हजर राहण्याचे आदेशसुद्धा शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी शिक्षक हजर राहत नसल्याच्या अनेक तक्रारी करण्यात येत आहेत. अशातच शिक्षण सभापतींनी ५ एप्रिल रोजी सकाळी ८.१५ वाजता देवगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलला तसेच ८.३० वाजता तळेगाव दशासर जिल्हा परिषद शाळेला आकस्मिक भेट दिली असता, मुख्याध्यापक व शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, देवगाव येथील शाळेत चार तसेच तळेगाव दशासर येथे १७ शिक्षक कार्यरत असताना, एकही शिक्षक उपस्थित नव्हता. त्यामुळे या शिक्षकांविरोधात कारवाई प्रस्तावित करण्याबाबतचे पत्र शिक्षण सभापतींनी सीईओंना दिले आहे. आता सीईओ यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोट
मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचे आदेश असतानाही वरील दोन्ही ठिकाणी एकही शिक्षक उपस्थित नव्हता. ही बाब योग्य नसून आपण संबंधितांवर प्रशासकीय कारवाई बाबतचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
सुरेश निमकर
सभापती शिक्षण समिती