कारची दुचाकीला धडक; वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 17:14 IST2021-10-31T17:13:19+5:302021-10-31T17:14:43+5:30
तळेगाव-देवगाव मार्गावर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांचा दुचाकीस्वार मुलगा जखमी झाला आहे.

कारची दुचाकीला धडक; वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी
अमरावती : तळेगाव दशासर येथून दोन किमी अंतरावर सुपर एक्स्प्रेस हायवेवर तळेगाव-देवगाव मार्गावर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर, त्यांचा दुचाकीस्वार मुलगा जखमी झाला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, रतन शिवराम भगत असे मृताचे नाव आहे. महिंद्र रतन भगत असे जखमी मुलाचे नाव आहे. ते पुलगाव येथील रहिवासी आहेत. शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास हा अपघात घडला. कार (एमएच २७ बीई ४९३०) अमरावतीकडे निघाली होती, तर दुचाकी (एमएच ३२ एडी ५८७८) वरील पिता-पुत्र तळेगावहून देवगावकडे निघाले होते. यावेळी कारची दुचाकीला जबर धडक बसली, या अपघातात रतन भगत यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर, मुलगा महिंद्र जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस ठाण्याचे संदेश चव्हाण, मनीष आंधळे, बाबा ठाकरे, अमर काळे यांची चमू ठाणेदार अजय आकरे व महामार्ग पोलीस प्रभारी अधिकारी टोकलवाड घटनास्थळी दाखल झाली. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बिरांजे करीत आहेत.