लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत शेकडो महाविद्यालयांतील विद्यार्थी, संशोधक तसेच प्राध्यापकांना जागतिक स्तरावरील नवनवीन माहितीचे स्त्रोत उपलब्ध व्हावेत, यासाठी विद्यापीठाच्या ज्ञान स्त्रोत केंद्रातर्फे ‘संत गाडगे बाबा युनिव्हर्सिटी लायब्ररी कन्सोर्शिया फॉर कॉलेजेस’ही नवीन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांनादेखील माहितीचे नवीन स्त्रोत सहजगत्या प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी पुढाकार घेऊन ही योजना अमलात आणली आहे.विद्यापीठाकडून दरवर्षी विद्यापीठातील पदव्युत्त विभागांमध्ये शिकणाऱ्या तसेच संशोधन करणाºया विद्यार्थ्यांसाठी १५ हजाराहून अधिक जर्नल्स खरेदी केले जातात. यामध्ये इंडियन जर्नल्स, सायन्स जर्नल्स, सोशल सायन्स जर्नल्स, प्रोक्वोस्ट डेलनेट मॅनेजमेंट कलेक्शन तसेच विविध प्रकारचे ईबुक्सचा समावेश आहे. यावर विद्यापीठाकडून साधारणपणे ६५ लाख रूपयांचा खर्च केला जातो. मात्र, आतापर्यंत हे जर्नल्स केवळ विद्यापीठातीलच विद्यार्थ्यांना अथवा प्राध्यापकांना घेता येत होता. परंतु, कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या पुढाकाराने हे सर्व जर्नल्स महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनादेखील उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विद्यापीठ ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक मोहन खेरडे यांनी ही योजना आखलीे. यामध्ये महाविद्यालयांना जवळपास सर्वच विषयांवरील जर्नल्स उपलब्ध होणार आहेत. विद्यमान परिस्थितीत ज्ञानाचे स्त्रोत भरपूर उपलब्ध असून, ते महागडे असल्याने महाविद्यालयांना विकत घेणे शक्य नसते. त्यामुळे महाविद्यालयेसुद्धा विद्यापीठाचाच भाग असल्याने त्यांना अल्प दरात ही सुविधा मिळणार आहे.भरावे लागणार शुल्कभारतीय आणि विदेशातील नामवंत प्रकाशनाचे जर्नल्स महाविद्यालयांना खरेदी करावयाचे असल्यास त्यांना १५ ते २० लाखांचा खर्च येऊ शकतो. हा खर्च महाविद्यालयांना शक्य नसल्याने तेथे शिकणाºया विद्यार्थ्यांना माहितीच्या नवनवीन स्त्रोतांपासून वंचित राहावे लागते. परंतु, या योजनेमुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांना (युजी आणि पीजी) केवळ ४ लाख रुपये वार्षिक दराने हे जर्नल्स उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना यासाठी २ लाख भरावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त नॉन टेक्निकल महाविद्यालयांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २० हजार, तर युजी अभ्यासक्रमांसाठी १० हजार रुपये वार्षिक भरावे लागतील. या योजनेत सहभागी झालेल्या महाविद्यालयातील प्रत्येक शैक्षणिक विभागाला एक लॉगीन आयडी आणि पासवर्ड दिला जाईल. त्यावरून या सर्व १५ हजार जर्नल्स आणि ईबुक्सचा अॅक्सेस त्यांना उपलब्ध होईल.
संशोधनासाठी ‘जर्नल्सचा अॅक्सेस’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:24 IST
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत शेकडो महाविद्यालयांतील विद्यार्थी, संशोधक तसेच प्राध्यापकांना जागतिक स्तरावरील नवनवीन माहितीचे स्त्रोत उपलब्ध व्हावेत, यासाठी विद्यापीठाच्या ज्ञान स्त्रोत केंद्रातर्फे ‘संत गाडगे बाबा युनिव्हर्सिटी लायब्ररी कन्सोर्शिया फॉर कॉलेजेस’ही नवीन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
संशोधनासाठी ‘जर्नल्सचा अॅक्सेस’चा आधार
ठळक मुद्देकुलगुरूंचा पुढाकार : विद्यापीठ ज्ञान स्त्रोत केंद्र योजनेची मुहूर्तमेढ, महाविद्यालयांना संधी