बेनोडा येथे कोविड रुग्णालयाच्या तयारीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:12 IST2021-05-13T04:12:59+5:302021-05-13T04:12:59+5:30
जिल्हाधिकारी नवाल यांनी केली पाहणी, ऑक्सिजन सुविधेच्या ५० खाटा राहणार वरूड : तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता, आ. ...

बेनोडा येथे कोविड रुग्णालयाच्या तयारीला वेग
जिल्हाधिकारी नवाल यांनी केली पाहणी, ऑक्सिजन सुविधेच्या ५० खाटा राहणार
वरूड : तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता, आ. देवेंद्र भुयार यांच्या मागणीनुसार आरोग्य मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाला कोविड रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बेनोडा येथे कोविड रुग्णालयाच्या तयारीला वेग आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्यासंबंधी पाहणी केली. येथे ५० ऑक्सिजन सुविधेच्या खाटा राहणार असल्याने तालुकावासीयांना दिलासा मिळणार आहे.
बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी दुपारी आरोग्य अधिकाऱ्यांसह भेट देऊन तालुका प्रशासन आणि आरोग्य विभागाची बैठक घेतली. तातडीने ऑक्सिजन असलेले ५० खाटांचे कोवि़ड रुग्णालय येथे सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख, नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी, गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, मुख्याधिकारी रवींद्र पाटील, बेनोडाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश देशमुख, डॉ. सोहेल खान यावेळी उपस्थित होते. कोविड रुग्णालयामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दुसरीकडेे हलविण्यात येणार आहे.
----------------
वरूडच्या लसीकरण केंद्राला भेट
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महसूल, नगर परिषद आणि आरोग्य प्रशासनाकडून तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. वरूड येथील न्यू इंग्लिश शाळेत सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर भेट देऊन लाभार्थींशी संवाद साधला. येथील व्यवस्था आणि नियोजनाबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल देशमुख यांच्या कार्यप्रणालीवाबद्दल समाधान व्यक्त केले .