कडबी बाजार फिडरवरील वीज देखभाल, दुरुस्तीच्या कामांना गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:10+5:302021-06-03T04:10:10+5:30
अमरावती : शहरातील महावितरणच्या कडवी बाजार सेंटर अंतर्गत ११ के. व्ही. ताजनगर व ११ के. व्ही. चित्रा ...

कडबी बाजार फिडरवरील वीज देखभाल, दुरुस्तीच्या कामांना गती द्या
अमरावती : शहरातील महावितरणच्या कडवी बाजार सेंटर अंतर्गत ११ के. व्ही. ताजनगर व ११ के. व्ही. चित्रा फिडरवर विद्युत भार वाढल्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे मान्सूनपूर्व कामांना गती द्यावी, अशा सूचना आमदार सुलभा खोडके यांनी महावितरण अभियंत्यांना दिल्या आहेत.
चित्रा चौकातील ११ केव्ही फिडरवरील विद्युत भारची विभागणी करण्यासाठी साधारणतः २२ लक्ष रुपये खर्च करून ११ केव्हीची भूमिगत वाहिनी दीड किलोमीटरपर्यंत टाकण्याचे काम महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे. वीजपुरवठ्याची देखभाल व दुरुस्तीसंदर्भातील कामांचा आ. खोडके यांनी मंगळवारी ‘ऑन दी स्पॉट’ पाहणी करून आढावा घेतला. ही कामे ८ दिवसांत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी महावितरण अभियंत्यांना केली. चित्रा फिडरवर विद्युतभार अधिक असल्याने या भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाणात वाढले आहे. त्यावरील काही विद्युतभार नवसारी फिडरवर टाकण्याकरिता १.५ किलोमीटरच्या भूमिगत वाहिनीचे काम महावितरणाच्यावतीने सुरू आहे. आगामी पावसाळा लक्षात घेता सदर कामे मान्सूनपूर्व करून नागरिकांना सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे वीजपुरवठ्याच्या जोडणीसह देखभाल व दुरुस्तीची कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याची सूचना आ. खोडके यांनी महावितरण अभियंत्यांना दिली.
ट्रान्सपोर्ट नगरातील उपकेंद्राच्या प्रस्ताव मंजुरीसाठी आमदार खोडके यांचा महावितरणकडे पाठपुरावा सुरु केला आहे. आगामी काळात ट्रान्सपोर्टनगर येथे महावितरणचे उपकेंद्र स्थापन झाल्यास स्थानिक भागातील विजेची समस्या कायमची निकाली निघून स्थानिकांना अखंडित वीज सेवा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे. यावेळी आमदार सुलभा खोडके समवेत महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद काटकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय कुटे, सहाय्यक अभियंता प्रफुल चितोडे, यश खोडके, ॲड. शोएब खान, गाझी जहरोश, सना ठेकेदार, सनाउल्ला, नदीम मुल्ला आदी उपस्थित होते.