चांदूर बाजार तालुक्यात शेतकरी लागले कामाला, मार्गदर्शनाची वानवा
तळवेल : चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांना फवारणीचे सत्र सुरू केले आहे. सततच्या पावसामुळे पिकांमध्ये तण माजले, शिवाय किडींनीही जोर धरला आहे. पाऊस ओसरताच त्याच्या बंदोबस्तासाठी कीटकनाशक फवारणीला वेग आला आहे. तथापि, नेमके कोणते आणि किती प्रमाणात कीटकनाशक फवारावे, याबाबत ग्रामस्तरावर मार्गदर्शनाची वानवा आहे.
खरिपातील मूग व उडीद ही पिके परिपक्व झाले आहे. काही ठिकाणी शेंगांना कोंब आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तीळ व सोयाबीन पिके सध्या फुलांनी बहर धरला असून, काही ठिकाणी शेंगासुद्धा लागल्या आहेत. आता फक्त शेंगा भरण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. परंतु, तोपर्यंत आपली पिके कीटकमुक्त ठेवण्यासाठी सोयाबीनवर तीन ते चार कीटकनाशक फवारणी करून उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानुसार सध्या तालुक्यातून पावसाने विश्रांती घेतली असून, आता शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणीला वेग दिला आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी शेतात नेमके कुठले व कोणत्या कंपनीचे औषध फवारावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
-----------------
धुक्याने वाढविली चिंता
तालुक्यामध्ये एक-दोन दिवसांपासून सकाळी दाट धुके दाटते. ही शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचे जाणवते. यामुळे फुले गळतात व शेंगा पूर्णपणे भरत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे.