‘पीएचसी’ स्तरावर कोविड केअर सेंटर उभारणीच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:20+5:302021-06-02T04:11:20+5:30

- ना. यशोमती ठाकूर अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ...

Accelerate the construction of Covid Care Center at PHC level | ‘पीएचसी’ स्तरावर कोविड केअर सेंटर उभारणीच्या कामाला गती

‘पीएचसी’ स्तरावर कोविड केअर सेंटर उभारणीच्या कामाला गती

- ना. यशोमती ठाकूर

अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ग्रामीण भागात प्रभावी उपचार यंत्रणा निर्माण व्हावी, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. केंद्रांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविड केअर सेंटर उभारण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात २० केंद्रांवर कोविड केअर सेंटर उभारण्यात येईल. त्यानंतर इतरही ठिकाणी उपचार यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शासन - प्रशासनाच्या विविध प्रयत्नांनी बाधितांची संख्या कमी झाली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून ग्रामीण स्तरावर उपचार यंत्रणा उभारण्यास गती देण्यात आली आहे, असे पालकमंत्री ठाकूर यांनी सांगितले.

साथीच्या काळात स्वतंत्र कोविड रुग्णालये, तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर, विद्यापीठ व पीडीएमसीत चाचणी सुविधांसह ऑक्सिजन प्लांट उभारणीचाही निर्णय झाला. केवळ साथीच्या काळातच नव्हे तर इतरवेळीही प्रभावी उपचार यंत्रणा सर्वत्र उपलब्ध असावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी रुग्णालयांना इमारत निधी उपलब्ध करून देण्यापासून आवश्यक साधनसामग्री पुरविण्यात येत आहे. या विविध प्रयत्नांनी कोविडबाधितांची संख्या रोडावली असली तरीही संभाव्य धोके ओळखून उपचार यंत्रणा निर्माण करणे व संसर्ग रोखण्यासाठी दक्षता बाळगणे, सातत्यपूर्ण जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक कार्यवाही विविध स्तरांतून होत आहे. यंत्रणांनी या बाबीचे गांभीर्य ओळखून नियोजित कामांना गती द्यावी, तसेच कोविडसंदर्भात रुग्णांना उत्तम उपचार मिळवून देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये सुसज्ज ठेवावीत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक साधनसामग्रीबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करावेत, निधीची कमतरता पडू देणार नाही, असे निर्देश पालकमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

बॉक्स

म्युकरमायकोसिसची माहिती ग्रामीण भागात पोहोचावी

म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र वॉर्ड उभारला असून, ४० खाटांची व्यवस्था केली आहे. म्युकरमायकोसिसचे निदान लवकर होणे आवश्यक असते. त्यानुसार म्युकरमायकोसिसची लक्षणे, काळजी, उपचार यांची माहिती ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध

ग्रामीण स्तरावरील आरोग्य यंत्रणेसाठी जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिलेले आहेत. पहिल्या टप्प्यात ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले जात आहेत. इतरही सर्व केंद्रांना वेळेत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले जातील, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी सांगितले.

Web Title: Accelerate the construction of Covid Care Center at PHC level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.