तीन वनकर्मचार्‍यांसह चौघांना एसीबीकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST2020-12-30T04:17:01+5:302020-12-30T04:17:01+5:30

मंगळवारी कारवाई, जेसीबी परत देण्यासाठी शेतकऱ्याला मागितले एक लाख रुपये अमरावती/तिवसा : वनजमिनीवर खोदकाम केल्याची बतावणी करून त्यासंबंधी कोणतीही ...

ACB arrests four, including three foresters | तीन वनकर्मचार्‍यांसह चौघांना एसीबीकडून अटक

तीन वनकर्मचार्‍यांसह चौघांना एसीबीकडून अटक

मंगळवारी कारवाई, जेसीबी परत देण्यासाठी शेतकऱ्याला मागितले एक लाख रुपये

अमरावती/तिवसा : वनजमिनीवर खोदकाम केल्याची बतावणी करून त्यासंबंधी कोणतीही कारवाई न करण्यासाठी व जप्त केलेला जेसीबी सोडविण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या वनविभागाच्या तीन कर्मचार्‍यांसह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने मंगळवारी अटक केली. तिवसा तालुक्यातील चिखली फाट्यावर खासगी व्यक्तीमार्फत ही रक्कम वनकर्मचाऱ्यांनी स्वीकारली.

वनपाल तथा माळेगाव वर्तुळाचे क्षेत्र सहायक सुरेश संपतराव मनगटे (५३), वनरक्षक तथा माळेगाव वर्तुळाचे क्षेत्र सहायक प्रभुदयाल प्रकाश चौधरी (३९), वनमजूर तथा मालेगाव वर्तुळाचे क्षेत्र सहायक संजय वासुदेवराव माहोरे (५६) व तिवसा येथील रहिवसी प्रशांत राजेंद्र भडके (३७) अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अमरावती येथे राहणाऱ्या शेतकऱ्याला वनजमिनीवर खोदकाम केल्याचे सांगून त्याचा जेसीबी ताब्यात घेण्यात आला होता. पुढील कारवाई टाळण्यासाठी व जेसीबी सोडविण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी प्रशांत घोडकेमार्फत देण्यास कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. त्यासाठी शेतकऱ्याला मार्डी ते वऱ्हा मार्गावरील चिखली फाट्यावर बोलावले होते.

प्रकरणाची पडताळणी २४ डिसेंबर रोजी करण्यात आली. मुख्य वनसंरक्षक, अमरावती यांना सदर तक्रारीबाबत कळविल्यानंतर २८ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, सहायक उपनिरीक्षक श्रीकृष्ण तालन, पोलीस नायक सुनील युवराज राठोड, पोलीस शिपाई अभय वाघ, तुषार देशमुख, वाहनचालक चंद्रशेखर जनबंधू यांनी सापळा रचून लाचखोरांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: ACB arrests four, including three foresters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.