बाभळीच्या झाडांची कत्तल, पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:12 IST2021-04-04T04:12:52+5:302021-04-04T04:12:52+5:30
पीडब्ल्यूडीला जाग : पोलीस कारवाईकडे लक्ष आसेगाव पूर्णा : सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चांदूर बाजार अंतर्गत येणाऱ्या आसेगाव पूर्णा ते ...

बाभळीच्या झाडांची कत्तल, पोलिसांत तक्रार
पीडब्ल्यूडीला जाग : पोलीस कारवाईकडे लक्ष
आसेगाव पूर्णा : सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चांदूर बाजार अंतर्गत येणाऱ्या आसेगाव पूर्णा ते चांदूर बाजार मार्गालगत बाभळीच्या असंख्य झाडांची कत्तल गत दोन महिन्यांपासून केली जात होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच सार्वजनिक बांधकाम विभाग खळबळून जागा झाला. सदर चोरीच्या घटनेची तक्रार आसेगाव पोलिसांत दाखल करण्यात आली.
आसेगाव पूर्णा ते चांदूर बाजार मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बाभळीची मोठी असंख्य झाडे आहेत. मात्र, त्या झाडांची कत्तल होत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. आसेगाव ते चांदूर बाजार या मार्गाने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पर्यावरणप्रेमींच्या हा गंभीर प्रकार दृष्टीस पडला. यातील अनेक झाडे अवघ्या २४ तासांपूर्वीच तोडली असावी, असा पर्यावरणप्रेमींचा अंदाज होता. काल-परवापर्यंत डौलाने रस्त्याच्या कडेला उभी असलेली मोठी हिरवीगार झाडे एक-एक करून भल्या पहाटे कत्तल केली जात आहे. वृक्षतोडीबाबत या जागरूक नागरिकांना पर्यावरणप्रेमी म्हणून वाटणारी चिंता छायाचित्रासह ‘लोकमत’ने ३१ मार्च रोजी ‘आसेगाव-चांदूर बाजार मार्गावरील बाभळीच्या झाडांची कत्तल’ या मथळ्याने प्रकाशात आणली. त्यानंतर २ मार्च रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्याच्या टोकावर असलेले आसेगाव पूर्णा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
कारवाईची मागणी
तक्रारीनुसार, ३१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी रस्त्याची पाहणी केली असता, आसेगाव ते कोतगावंडी फाट्यापर्यंत दोन बाभळीची झाडे व झाडांच्या फांद्या तोडलेल्या आढळल्या. वृक्षतोडीला आळा बसण्याच्या दृष्टिकोनातून अज्ञात व्यक्तींकडून अवेळी होत असलेली वृक्षतोड थांबविण्याकरिता कारवाई करण्यात यावी. कडुनिंबाच्या झाडालासुद्धा खाचा करण्यात आल्या आहेत. अशा कृत्यास आळा बसण्याकरिता निदर्शनास येताच कारवाई करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.
------------