अबब ! विहिरीचे पाणी गरम
By Admin | Updated: September 24, 2015 00:16 IST2015-09-24T00:16:41+5:302015-09-24T00:16:41+5:30
शहरातील बडासे ले-आऊट मधील दिनेश मनोहर टिपरे यांच्या घरातील विहिरीतील पाण्याचे तापमान अचानक वाढले आहे.

अबब ! विहिरीचे पाणी गरम
मोर्शीतील आश्चर्य : झाकण काढताच निघते वाफ; १० दिवसांपासून तापमान वाढलेले
नरेंद्र निकम मोर्शी
शहरातील बडासे ले-आऊट मधील दिनेश मनोहर टिपरे यांच्या घरातील विहिरीतील पाण्याचे तापमान अचानक वाढले आहे. हा आश्चर्यकारक प्रकार मागील १० दिवसांपासून सतत सुरू आहे.
सकाळी विहिरीवरील झाकण काढताच गरम पाण्यामुळे निर्माण होणारी वाफ बाहेर येते. टिपरे यांच्या घराशेजारील इतर विहिरींमधील पाणी मात्र थंड आहे. या गरम पाण्याबाबत नाना तर्क व्यक्त केले जात असून टिपरे कुटुंबीय चिंतेत पडले आहे. टिपरे कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना हा प्रकार सुरू झाला. ते स्वगृही परतल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात आली. प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याला माहिती दिली. आरोग्य विभागाने नमुने तपासणीसाठी नेले आहेत.
असा झाला उलगडा
१० सप्टेंबर रोजी माठात पाणी भरले असता ते गरम असल्याचे लक्षात आले. पुन्हा पुन्हा पाणी काढले तरीही ते गरमच होते.
आंघोळीसाठी वापर
विहिरीचे पाणी हाताने काढता यावे, इतकी त्याची पातळी वाढलेली आहे. पाण्याला वास येत नाही. हे पाणी आंघोळीसाठी वापरले जात आहे. श्रीक्षेत्र सालबर्डी येथेही पहिल्या पायरीजवळ असलेल्या बोअरमधून असेच गरम पाणी नेहमी वाहत असते.
पाण्याचे नमुने आरोग्य खात्याकडे पाठविले
विहिरीचे पाणी गरम येत असल्याने बघ्यांनी गर्दी केली होती. नमुने तपासणीसाठी आरोग्य खात्याकडे पाठविण्यात आले आहे. आरोग्य खात्याने हे नमुने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे तपासणीसाठी पाठविले आहे. अद्याप तपासणी अहवाल प्राप्त व्हायची आहे.
आठ दिवस बाहेरगावी गेलो होतो. गावाहून परत आल्यानंतर विहिरीतील पाणी काढले. ते गरम आढळून आले. हा प्रकार १० सप्टेंबर रोजी झाला. तेव्हापासून विहिरीचे पाणी पिणे बंद केले. आता या गरम पाण्याचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.
- दिनेश टिपरे,
विहीरमालक