अबब! किती ही भाडेवाढ?
By Admin | Updated: August 26, 2014 23:02 IST2014-08-26T23:02:14+5:302014-08-26T23:02:14+5:30
महागाई गगनाला भिडली आहे. वाढत्या महागाईसोबतच लोकांचे उत्पन्न आणि जीवनस्तरही उंचावला आहे. सर्वस्तरातील नागरिकांच्या उत्पन्नात झालेली वाढ सुखावह असली तरी अमर्याद गरजांच्या

अबब! किती ही भाडेवाढ?
ना नियम, ना बंधन : १०० ते २०० टक्के वाढ, सामान्यांचे बिघडले बजेट!
इंदल चव्हाण - अमरावती
महागाई गगनाला भिडली आहे. वाढत्या महागाईसोबतच लोकांचे उत्पन्न आणि जीवनस्तरही उंचावला आहे. सर्वस्तरातील नागरिकांच्या उत्पन्नात झालेली वाढ सुखावह असली तरी अमर्याद गरजांच्या तुलनेत वाढते उत्पन्नही अपुरे पडत आहे. दैनंदिन अत्यावश्यक गरजांमध्ये अलीकडे घरभाड्यांचा समावेश केला जाऊ लागला आहे. चार वर्षांची आकडेवारी पाहता दरडोई उत्पन्नात सरासरी २५ ते ५० टक्क्यांनी वाढ झाली असून घरभाड्यांमध्ये मात्र १०० ते २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ही भाडेवाढ अर्थशास्त्राच्या नियमांना छेद देणारी आहे. त्यामुळे भाडेकरूंच्या आर्थिक अडचणीत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. नोकरीनिमित्त शहरात आलेल्या कुटुंबांना निवासाची व्यवस्था करताना घरभाडेवाढीचा ताण सहन करावा लागत आहे.
सन २०१० मध्ये १० हजार रुपये मासिक मिळकत असलेल्या व्यक्तींना ३ हजार रुपयांत २ बेडरुमचा फ्लॅट उपलब्ध होणे शक्य होते. आता त्या व्यक्तिची मासिक मिळकत १५ हजार रुपये झाल्याचे गृहीत धरली तरी त्याच फ्लॅटचे भाडे मात्र ८ ते १० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे भाडेकरूंच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. शहरात निवासाची दुसरी योग्य सोय नसल्याने मागेल ते भाडे देणे असा नाईलाज बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांचा झाला आहे.
सन २०१० मध्ये ज्या खोलीचे भाडे ८०० रुपये होते त्याच खोलीचे भाडे आता २००० रुपयांवर पोहोचले आहे. प्रचंड भाडेवाढीमुळे मध्यमवर्गीयांसह सर्वच स्तरातील नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
अमरावती शहरात वीज कंपनीचे कर्मचारी वास्तव्यास आल्यानंतर अचानक भाडेवाढ सुरू झाली. वीज कंपनीमुळे सुरू झालेला हा प्रकार त्यानंतर प्रघात झाला. उत्तम भाडे मिळत असल्यामुळे अमरावतीकरांनी गृहनिर्मितीत पैसा गुंतविला. घराची किंमतही वाढते आणि भाड्याच्या मिळकतीवर गृहकर्जाची परतफेड करता येते, असा दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामान्य अमरावतीकरांनी भाड्यासाठीच्या गृहखरेदीला प्राधान्य दिले. 'रेन्टल हाऊस कंसल्टंसी' चालविणाऱ्यांचाही व्यवसाय त्यामुळे बहरला.
ंभाडेवाढीची कारणे
शहराचा विस्तार झाला तरी त्याला मर्यादा आहेत; पण बाहेरून अनेक कारणांनी शहरात येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी फ्लॅट सिस्टीम उभ्या राहात आहेत. काही ठिकाणी घरे भाडयाने दिली जातात; तरीही निवासाची गरज भागत नाही. त्यामुळे उपलब्ध घरांच्या मालकांनी घरे भाड्याने देऊन उत्पन्नाचा नवा स्त्रोतच निर्माण केला आहे. परिसरनिहाय घरभाडे आकारण्याची पध्दतही अंमलात आणली जात आहे.