विभागाला मागणीच्या तुलनेत ३० टक्केच केरोसीन पुरवठा
By Admin | Updated: February 7, 2015 23:16 IST2015-02-07T23:16:31+5:302015-02-07T23:16:31+5:30
अमरावती विभागात १ कोटी ८१ लाख १३ हजार लिटर केरोसीनची दर महिन्याची मागणी आहे. या तुलनेत फेब्रुवारी व मार्च २०१५ महिन्यात ५५ लाख ८० हजार लिटर केरोसीनचा पुरवठा होणार आहे.

विभागाला मागणीच्या तुलनेत ३० टक्केच केरोसीन पुरवठा
गजानन मोहोड - अमरावती
अमरावती विभागात १ कोटी ८१ लाख १३ हजार लिटर केरोसीनची दर महिन्याची मागणी आहे. या तुलनेत फेब्रुवारी व मार्च २०१५ महिन्यात ५५ लाख ८० हजार लिटर केरोसीनचा पुरवठा होणार आहे. मागणीच्या तुलनेत हा पुरवठा केवळ ३०.८ टक्केच आहे. जानेवारी महिन्यात केंद्र शासनाने केरोसीनच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात कपात केली होती. या पार्श्वभूमीवर केरोसीन पुरवठ्यात अंशत: वाढ झाल्याने शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.
विभागातील २१ लाख २ हजार शिधाधारकांना परवानाधारक किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून गावपातळीवर केरोसीनचा पुरवठा करण्यात येतो. काही वर्षांत स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर वाढल्याने केंद्र शासनाने चार वर्षांत चारवेळा पुरवठ्यात कपात केली. जानेवारी महिन्यातील कपात ही ३८ ते ४० टक्के होती. त्यामुळे ग्रामीण भागात केरोसीन टंचाईचा भडका उडाला होता. रेशन व केरोसीन दुकानदार संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. १७ मार्चला आॅल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशन दिल्लीच्यावतीने सर्व परवानाधारक विक्रेत्यांच्या समवेत व राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू) यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केरोसीन पुरवठ्यात वाढ केली आहे. विभागात दर महिन्याची १०० टक्के मागणी १ कोटी ८१ लाख १३ हजार लिटर असताना डिसेंबर २०१४ मध्ये ६१ लाख ५६ हजार लिटर पुरवठा होता. पुढच्याच महिन्यात जानेवारी २०१५ मध्ये मोठी कपात होऊन ३८ लाख २८ हजार केरोसीनचा पुरवठा करण्यात आला. यामध्ये वाढ होऊन फेब्रुवारी व मार्च २०१५ करिता ५५ लाख ८० हजार लिटर केरोसीनचा पुरवठा होणार आहे. पुरवठ्यात अंशत: वाढ केली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत ५ लाख ७६ हजार लिटरने कमीच आहे.