अमरावती : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश व महाराष्ट्र यांच्यात प्रवाशांची ने-आण करणाऱ्या बसगाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मध्यप्रदेश राज्य परिवहन प्राधिकरणाच्या अपर परिवहन आयुक्तांनी जारी केला आहे. यामुळे अमरावती येथून इंदूर, भोपाळकरिता जाणारी बसफेरी थांबविण्यात आली आहे. वरूड, मोर्शी, धारणी, अचलपूर तालुक्यांतील नागरिकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
------------------
विद्यापीठात महिला सक्षमीकरण व्याख्यान
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत पी.जी. डिप्लोमा इन कम्युनिकेशन स्कील्स इन इंग्लिश अभ्यासक्रमाद्वारे ‘इंक्रिझिंग रेट ऑफ क्राईम अगेन्स्ट वुमेन अँड सेफ्टी मेझर्स’ या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर येथील सी.पी. अँड बेरार महाविद्यालयातील असोसिएट प्राध्यापक रश्मी पारस्कर, संचालक श्रीकांत पाटील, असरा पठाण, सपना महल्ले, अंजली सेठ, काशीफ अहमद, असरा पठाण आदी उपस्थित होते.
-----------
राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत अमरावतीचे खेळाडू
अमरावती : सबज्युनिअर राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी राज्य संघात कांचन उभाड, धनश्री नाईक, सलोन इंगोले, नूतन देशमुख, सुभाषचंद्र बिसेन तसेच ३८ व्या सिनियर राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत खुशी चंदेल, यामिनी अर्डक, शुभम तिजारे, मुरली वैद्य यांची निवड झाली. स्पर्धेसाठी १९ मार्चपासून भंडारा येथे प्रशिक्षण शिबिर सुरू झाले. २३ ते २७ मार्च दरम्यान भिलाई (छत्तीसगढ) येथे स्पर्धा होणार आहे.