महापालिकेत ‘आॅन दी स्पॉट’ निलंबन रद्द
By Admin | Updated: June 25, 2015 00:15 IST2015-06-25T00:15:02+5:302015-06-25T00:15:02+5:30
महापालिकेच्या प्रकाश विभागाचे उपअभियंता अशोक देशमुख यांना कंत्राटदारांच्या बैठकीत गत महिन्यात आयुक्तांनी ‘आॅन दी स्पॉट’ निलंबन केले होते.

महापालिकेत ‘आॅन दी स्पॉट’ निलंबन रद्द
आयुक्तांचा निर्णय : राजकीय दबावतंत्र वाढत असल्याची चर्चा
अमरावती : महापालिकेच्या प्रकाश विभागाचे उपअभियंता अशोक देशमुख यांना कंत्राटदारांच्या बैठकीत गत महिन्यात आयुक्तांनी ‘आॅन दी स्पॉट’ निलंबन केले होते. परंतु राजकीय दबावतंत्र वाढताच आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे दोन पावले मागे सरकले असून देशमुख यांचे महिन्याभऱ्यापूर्वी केलेले निलबंन रद्द करण्यात आले.
आयुक्तांनी १६ मे रोजी बांधकाम कंत्राटदार, अधिकारी व अभियंत्यांची बैठक बोलविली होती. या बैठकीत आयुक्तांनी प्रकाश विभागाचे उपअभियंता देशमुख यांना रस्ते निर्मितीत केबल उशिरा टाकल्याप्रकरणी जाब विचारला असता ते व्यवस्थितपणे उत्तर देवू शकले नाहीत. परिणामी आयुक्त संतप्त झालेत. अशोक देशमुख यांचे ‘आॅन दी स्पॉट’ निलंबन करण्याचे आदेश त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. क्षणात उपअभियंत्याचे निलंबन करण्यात आल्याने अख्खे प्रशासन हादरुन गेले होते. मात्र जून महिन्यात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी आक्रमक भूमिका घेवून आयुक्तांच्या कारभारावर बोट ठेवले. अधिकारी, कर्मचारी दहशतीत वावरत असल्याची बाब सदस्यांनी आयुक्तांच्या निदर्शसनास आणून दिली. अशोक देशमुख यांची चूक नसताना निलंबन करण्यात आले, हा देखील प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला. सदस्य आक्रमक होत असल्याचे बघुन आयुक्त गुडेवार यांनी देशमुख यांचे निलंबनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यानुसार आयुक्तांनी मंगळवारी देशमुख यांचे प्रशासकीय कारणास्तव निलंबन रद्द करुन पूर्ववत सेवा देण्याचे आदेश निर्गमित केले आहे. बुधवारी देशमुख हे सेवेत दाखल झालेत, हे विशेष. निलंबन रद्द करण्याबाबत आयुक्तांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.