रोजगार हमी योजनेसाठी ‘आधार’ अनिवार्य
By Admin | Updated: May 31, 2016 00:07 IST2016-05-31T00:07:20+5:302016-05-31T00:07:20+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रोजगार हमी योजनेच्या मजुरांसाठी आधार कार्डची नोंदणी अनिवार्य आहे.

रोजगार हमी योजनेसाठी ‘आधार’ अनिवार्य
न्यायालयाचे निर्देश : १६ हजार मजूर नोंदणीपासून वंचित
अमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रोजगार हमी योजनेच्या मजुरांसाठी आधार कार्डची नोंदणी अनिवार्य आहे. त्याकरिता १५ जून ही तारीख अंतिम असून जिल्ह्यात अद्यापही १६ हजार रोहयोचे मजूर आधार नोंदणीपासून वंचित असल्याची माहिती आहे.
रोहयोत अनियमितता, मजुरांच्या वेतनात गौडबंगाल आदी बाबी रोखण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत मजुरांचे खाते उघडले जात आहे. त्याकरिता आधारकार्ड अनिवार्य केले आहे. जिल्ह्यात रोहयोचे १ लाख ७६ हजार ६१९ मजूर आहेत. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ४८ हजार ६१७ मजुरांची आधार कार्डशी जोडणी करण्यात आली आहे. १६ हजार ५०४ एवढे मजूर आधार कार्ड नोंदणीपासून वंचित आहेत. रोहयोच्या सरासरीनुसार ९० टक्के मजुरांचे आधार कार्ड राष्ट्रीयीकृत बँकाना जोडण्यात आले आहे. केवळ १० टक्के मजूर आधार नोंदणीपासून वंचित आहेत. अशा मजुरांची नव्याने आधार कार्ड नोंदणी करुन १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचा कृति आराखडा तयार करण्यात आला आहे.
दुष्काळी परिस्थितीत रिकाम्या हाताला कामे मिळावी, यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे जिल्ह्यात जोरात सुरु असल्याचे रोहयोचे उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे यांनी सांगितले. १५ जूनपर्यंत आधारची नोंदणी करून प्रत्येक रोहयोच्या मजुरांना राष्ट्रीयकृत बँकेशी जोडले जाणार आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने अवगत केले आहे. १४५ कोटींपैकी चिखलदरा, धारणी या तालुक्यात ६५ कोटींची कामे करण्यात आली आहेत. राज्यात रोहयोची १४५ कोटी रुपयांची कामे करण्यात अमरावती जिल्हा अव्वल असल्याचा बहुमान पटकाविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन, कृषि, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वनविभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आदी यंत्रणेमार्फत रोहयोची कामे केली जातात. विभागाच्या मागणीनुसार रोहयोची कामे मंजूर केली जातात. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून निधी वळता केला जातो. मात्र मेळघाटात आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी रोहयो जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यात रोहयोच्या ८४०१६ मजुरांची पोस्टात खाते असून ते लवकरच राष्ट्रीयकृत बँकेत वळती केली जाणार आहे. ७४११३ रोहयो मजुरांचे राष्ट्रीयीकृत बँकेत आधारकार्ड क्रमांक जोडणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
अशी आहे जिल्ह्यात रोहयो मजुरांची संख्या
अचलपूर १०५५३, अमरावती ५०२०, अंजनगाव सूर्जी २४७७, भातकुली ४८२८, चांदूर बाजार ११०७०, चांदूर रेल्वे ९५५२, दर्यापूर ५५२४, धामणगाव रेल्वे ६०४०, धारणी ३४८७१, मोर्शी १७९२१, नांदगाव खंडेश्वर ८३११, तिवसा ६२१७, वरुड १०६१९
३१ मार्च २०१६ पर्यत जिल्ह्यात १४४ कोटी रुपये रोहयोंवर खर्च करण्यात आले आहे. ही आकडेवारी राज्यात सर्वाधिक ठरली आहे. कुशल, अर्धकुशल मजुरांना कामे दिली जात आहेत. रोहयोच्या सर्वच मजुरांचे आधार कार्ड क्रमांकाशी नोंदणी केली जाणार आहे.
- आर. डी. काळे,
उपजिल्हाधिकारी, रोहयो