शाळांच्या संच मान्यतेसाठी आधारकार्ड सक्तीचे
By Admin | Updated: July 7, 2015 00:08 IST2015-07-07T00:08:41+5:302015-07-07T00:08:41+5:30
शाळेत बोगस विद्यार्थी नोंदवून जादा शिक्षकांच्या नियुक्त्या करणाऱ्या आणि शासनाची फसवणूक करून..

शाळांच्या संच मान्यतेसाठी आधारकार्ड सक्तीचे
अमरावती : शाळेत बोगस विद्यार्थी नोंदवून जादा शिक्षकांच्या नियुक्त्या करणाऱ्या आणि शासनाची फसवणूक करून अनुदान लाटणाऱ्या शाळांना यापुढे चाप बसणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०१६-१७) कुठल्याही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक असल्याची खात्री करूनच संच मान्यता दिली जाणार आहे.
मागील काही वर्षांपासून शाळेत बोगस विद्यार्थी नोंदविणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण न देणे, पटावर जास्त विद्यार्थी दाखवून जादा तुकड्या घेणे, गरज नसताना शिक्षकांच्या नियुक्त्यांच्या माध्यमातून शासनाची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात अनुदान या बाबी उघड झाल्या. याची तपासणी करण्यासाठी ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली होती. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. (प्रतिनिधी)
आधारची जबाबदारी शाळांची
विशेष पटपडताळणी मोहिमेत आढळलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमिवर शाळेच्या संच मान्यतेबाबत शासनाने हा निर्णय घेतला होता. प्रत्येक विद्यार्थ्याला आधारकार्ड देण्याची जबाबदारी त्या त्या शाळेची, संस्थेची आहे. कोणत्याही शाळेत विद्यार्थ्याची वाढ होत असल्यास संच मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांनी वाढ झालेल्या शाळांतील १०० टक्के मुलांचे संकेत आधार क्रमांक योग्य असल्याची स्थळावरून तपासणी करायची आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे यापुढे बोगस विद्यार्थी दाखविणाऱ्या संस्थेवर नियंत्रण येणार आहे. या निर्णयामुळे शासनाचे कोट्यवधी रूपये वाचणार आहेत.
सरसकट तपासणी होणार
शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या संच मान्यतेच्या पाच टक्के विद्यार्थ्यांची सरसकट तपासणी शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत केली जाणार आहे. त्याचबरोबर एक टक्का विद्यार्थ्यांची तपासणी शिक्षण संचालक पातळीवरुन तर अर्धा टक्का तपासणी शासनस्तरावरून करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी आपल्या अध्यादेशात नमूद केले आहे.