९ लाख ४९ हजार मतदारांचीच आधार नोंदणी
By Admin | Updated: June 25, 2015 00:12 IST2015-06-25T00:12:17+5:302015-06-25T00:12:17+5:30
राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रमाला जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली आहे. मात्र, या मोहिमेला सर्वत्र अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

९ लाख ४९ हजार मतदारांचीच आधार नोंदणी
ग्रामीण भागात माहितीच नाही : नोंदणीला अल्प प्रतिसाद
अमरावती : राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रमाला जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली आहे. मात्र, या मोहिमेला सर्वत्र अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील २२ लाख ४९ हजार १११ एकूण मतदारांपैकी आतापर्यंत केवळ १ लाख ४९ हजार १२ एवढ्या मतदारांनी आधार क्रमांकाची माहिती बीएलओकडे जमा केली आहे.
आधार क्रमांकाची माहिती जमा करणाऱ्या बीएलओकडे तसेच आॅनलाईन मतदारांचे आधार क्रमांक आणि मतदार ओळखपत्रांची सांगड घालण्याचे काम प्रशासनाने पूर्ण केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार गेल्या महिनाभरापूर्वी मतदार याद्या प्रमाणिकरणाच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. या मोहिमेनुसार आठवड्यातील दोन दिवस टप्प्याटप्प्याने मतदारांची माहिती संकलित केली जात आहे. मात्र. सूचीचा कालावधी आणि आता पेरणीची लगबग सुरु असल्याने या मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. वितरण प्रणालीतील दोष दूर करण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. मात्र, याची माहिती ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचत नसल्यामुळेही यात अडचणी येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार याद्या आधार नोंदणी मोहिमेला अतिशय थंड प्रतिसाद मिळत आहे.
मोहिमेचा उद्देश
मतदार यादीतील मतदारांची नावे आणि त्यांचा आधार क्रमांक याची सांगड घालणे, यादीतील दुबार नावे वगळणे, स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून बाद करणे व ओळखपत्रातील चुका दुरुस्त करणे.
२१ जूनचा मुहूर्त टळला
मतदार याद्या प्रमाणिकरणासाठी १७ मे नंतर २१ जूनचा मुहूर्त काढला होता. मात्र, २१ जूनची मोहीम रद्द करुन ती आता २८ जून रोजी जिल्हाभरात राबविली जाणार आहे.