काळजाचा चुकला ठोका; डॉक्टर, परिचारिकांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2022 11:41 PM2022-09-25T23:41:27+5:302022-09-25T23:42:31+5:30

जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथील नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू) येथील व्हेंटिलेटरला शॉर्ट सर्किटमुळे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. वाॅर्डातून येणारा धूर पाहून पालक, डॉक्टर, परिचारिका तसेच रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी एसएनसीयू विभागाकडे धाव घेत याठिकाणी दाखल ३७ नवजात शिशूंना सुरक्षित बाहेर काढले.

A missed beat of anxiety; Doctors, nurses rush | काळजाचा चुकला ठोका; डॉक्टर, परिचारिकांची धावपळ

काळजाचा चुकला ठोका; डॉक्टर, परिचारिकांची धावपळ

Next

उज्ज्वल भालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या एसएनसीयू कक्षात परिचारिका सलमा यांनी एका नवजाताला पटकन उचलले आणि पाठोपाठ डॉक्टर, परिचारिकांनी इतर नवजातांना उचलून कक्षाबाहेर आणले. तातडीने रुग्णवाहिकांमधून अन्यत्र हलविण्यात आले. रुग्णालयातील एसएनसीयू विभागात व्हेंटिलेटरला आग लागल्यामुळे पालकांच्याही काळजाचा ठोका चुकला; पण सर्व शिशू सुरक्षित होते. तथापि, सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुपर स्पेशालिटीमध्ये हलविलेला शिशू दगावला. 
  जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथील नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू) येथील व्हेंटिलेटरला शॉर्ट सर्किटमुळे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. वाॅर्डातून येणारा धूर पाहून पालक, डॉक्टर, परिचारिका तसेच रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी एसएनसीयू विभागाकडे धाव घेत याठिकाणी दाखल ३७ नवजात शिशूंना सुरक्षित बाहेर काढले. यावेळी व्हेंटिलेटरवर असलेल्या दोन गंभीर शिशूंसह इतर १२ नवजात शिशूंना रुग्णालय प्रशासनाने तातडीने इतर रुग्णालयांत दाखल केले. दोन ते तीन तास रुग्णालयांत धावपळीचा थरार सुरू होता. 
३७ नवजात शिशू हे या विभागात उपचारासाठी दाखल होेते. यामध्ये  दोन नवजात शिशू गंभीर असल्याने ते व्हेंटिलेटरवर होते.  सर्वप्रथम या दोन बालकांना सुरक्षित बाहेर काढून त्यांना इतर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. यानंतर इतर शिशूंनाही तातडीने बाहेर काढून १२ शिशूंना इतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  
दगावलेला शिशू १४ सप्टेंबर रोजी जन्मला. कमी वजन आणि अपूर्ण दिवसाच्या या शिशूला तेव्हापासून एसएनसीयू विभागात ठेवण्यात आले होते. त्याला श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत होता, अशी माहिती डॉ. नितीन बरडिया यांनी दिली. 

रात्रीपासूनच व्हेंटिलेटरमध्ये बिघाड !
एसएनसीयू येथे गंभीर नवजात शिशूंसाठी तीन व्हेंटिलेटर आहेत. यातील दोन व्हेंटिलेटर हे मागील महिन्यातच शासनाकडून मिळाले. त्याच्या बळावर नवजात शिशूंवर उपचार सुरू होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, ते व्हेंटिलेटर शनिवारी रात्रीपासूनच चालू-बंद होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ते तेव्हाच का बदलण्यात आले नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

फायर ऑडिट असतानाही शॉर्टसर्किट?
डफरीन रुग्णालयाचे बीएमसीकडून फायर ऑडिट झाले होते. या फायर ऑडिटची मुदत ही जानेवारी २०२३ असल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या वाठोडकर यांनी दिली. 

चौकशीसाठी समिती गठित
घटनेबाबत माहिती मिळताच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. समिती स्थापन करून चौकशी करण्याचे व तसा अहवाल २४ तासांत सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. अमरावतीचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, महापालिकेचे अग्निशमन अधिकारी, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक समितीचे सदस्य आहेत. चोवीस तासांत अहवाल द्यायचा आहे. 

सलमा खान ठरल्या ‘देवदूत’ 
एसएनसीयू विभागातील व्हेंटिलेटरला आग लागताच या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या सलमा खान या परिचारिकेने व्हेंटिलेटरवरील नवजात शिशूला तातडीने उचलून बाजूला केले. या शिशूला आगीमुळे कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या वाठोडकर यांनी दिली. रुग्णालयातील इतरही डॉक्टर व कर्मचारी हे बालकांच्या मदतीला धावून गेले. खऱ्या अर्थाने सलमा यांच्यामुळे या नवजात शिशूला नवे जीवनदान मिळाल्याची चर्चा रुग्णालय परिसरात सुरू होती.

 

Web Title: A missed beat of anxiety; Doctors, nurses rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.