नवरात्रोत्सवात अंगणवाडीतील चिमुकल्यांना नऊ रंगांचा पोषण आहार
By जितेंद्र दखने | Updated: October 19, 2023 18:27 IST2023-10-19T18:27:36+5:302023-10-19T18:27:51+5:30
झेडपी महिला बालकल्याण विभागाचा आगळावेगळा उपक्रम

नवरात्रोत्सवात अंगणवाडीतील चिमुकल्यांना नऊ रंगांचा पोषण आहार
जितेंद्र दखने, अमरावती : सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. नवरात्रीच्या काळामध्ये नऊ रंगांना महत्त्व असतं. दर दिवशी एक याप्रमाणे नऊ रंगांच्या साड्यासुद्धा महिला परिधान करीत असतात. याचप्रमाणे एकात्मिक बालक विकास सेवा योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत दोन हजारांवर अंगणवाडी केंद्रांत नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस विविध रंगांचे पदार्थ पाककृतीच्या माध्यामातून चिमुकल्यांना दिले जात आहेत.
जिल्हाभरात अंगणवाडी केंद्रात हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. अंगणवाड्यांमध्ये हजारो बालके दररोज शिक्षणाचे धडे घेतात. या बालकांना अंगणवाडीमधून पोषण आहार दिला जातो. याशिवाय कुपोषित बालकांना तसेच गरोदर आणि स्तनदा मातांनासुद्धा आरोग्य विभागाच्या समन्वयातून पोषण आहार दिला जातो. दरम्यान, नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत महिला मंडळ दररोज विशिष्ट प्रकारच्या साड्या परिधान करतात. अशा पद्धतीने ९ दिवस ९ रंगांच्या साड्या महिला परिधान करतात. जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीमध्येदेखील हा उपक्रम राबविण्यात येतो आहे. यात रंगसंगतीचे औैचित्त्य साधून यावर्षी अंगणवाड्यामध्ये नऊ दिवस नऊ रंगांच्या पाककृती तयार केल्या जात आहेत. त्यानुसार सर्व अंगणवाड्यांमध्ये १५ ऑक्टोबरपासून पाककृती करण्यास सुरुवात झाली आहे. २३ ऑक्टोबरपर्यंत हा आगळावेगळा उपक्रम जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत सुरू ठेवण्यात येणार आहे.
दानशूर व्यक्तीचाही हातभार
जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात नवरात्रीच्या रंगाप्रमाणे चिमुकले, अंगणवाडीसेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका पोशाख परिधान करून येत आहेत. त्याचबरोबर अंगणवाडीतील चिमुकल्यांसाठी त्याच रंगांचा खाऊसुद्धा बनवण्यात येत आहे. यामध्ये गावातील काही दानशूर व्यक्ती बालगोपाळांच्या पंगतीमध्ये खाऊ आणून देत असल्यामुळे या उपक्रमाला दानशुर व्यक्तीचा हातभार लागत आहे.
नवरात्रीच्या सणांमध्ये केवळ त्या रंगांचे कपडे घालणे हा उद्देश नसून बालकांना त्या रंगाचा सकस पोषण आहार दिल्यास कुपोषणमुक्तीसाठीसुद्धा मदत होईल. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात हा उपक्रम राबविला जात आहे.
- डॉ. कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती