अमरावती जिल्ह्यात ९२ टक्के कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:22+5:302021-02-05T05:28:22+5:30
लक्ष्यांक गाठण्याच्या दिशेने वाटचाल, कोरोना योद्ध्यांचा विश्वास, सोमवारपासून पुन्हा लसीकरण अमरावती : अमरावती जिल्ह्यात १४ तालुक्यांपैकी नऊ तालुक्यांत ६७०० ...

अमरावती जिल्ह्यात ९२ टक्के कोरोना लसीकरण
लक्ष्यांक गाठण्याच्या दिशेने वाटचाल, कोरोना योद्ध्यांचा विश्वास, सोमवारपासून पुन्हा लसीकरण
अमरावती : अमरावती जिल्ह्यात १४ तालुक्यांपैकी नऊ तालुक्यांत ६७०० लक्ष्यांकापैकी ६१९७ लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ९२ टक्के काम पूर्ण झाले असून, पुन्हा लसीकरणाचा टप्पा सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. आतापर्यंत ३३ हजार ५०० लसीचे डोस आरोग्य यंत्रणांना मिळाले आहे.
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत २१७५९ पेक्षा अधिक लोक कोरोनामुळे बाधित ठरलेले आहेत. या जीवघेण्या आजारात ४१७ प्राण गमावावे लागले. कोरोनाच्या प्रादर्भावामुळे मध्यंतरी मोठी चिंता व्यक्त होत होती. मात्र, आता जिल्ह्यात कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आलेला आहे. दरम्यान जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील कोरोनायोद्धा्ंना अगोदर लसीकरण करण्यात येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार लसीकरण केले जात असून, आतापर्यंत ६१९७ जणांचे कोरोना लसीकरण झाले आहे. राज्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत अमरावती जिल्हा पहिल्या चार क्रमांकामध्ये आहे. आरोग्यसेवक, डॉक्टर्स तसेच अन्य कोरोनायोद्धांनी प्रशासनावर विश्वास ठेवून लसीकरण करून घेतल्यामुळे चांगले यश मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळापासून अमरावती जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांच्यासह आरोग्य यंत्रणांनी नियोजनपूर्वक काम करुन राज्यात चौथा क्रमांक मिळविला आहे. सध्या अमरावती जिल्हा विभागातून पहिल्या क्रमांकावर असून, आरोग्य विभागाने दिलेले लक्ष्यांक पूर्ण करण्याच्या दिशेने आशादायक वाटचाल सुरू आहे.
------------
कुठे किती लसीकरण
अचलपूर- ७१९
मोर्शी- ९०६
वरूड- ५०२
चांदूर रेल्वे-
तिवसा- ४६२
धारणी- ७४
दर्यापूर- ३६०
अमरावती- ८७६
अंजनगाव बारी- ५३५
धामणगाव रेल्वे- ४१८
------------------
आतापर्यंत ३३ हजार ५०० डोस प्राप्त
१६ जानेवारी रोजी लसीकरण्याच्या सुरूवातीला जिल्ह्याला १९ हजार डोस साठा मिळाला होता. यात कोविशिल्ड १७ हजार तर, दोन हजार कोव्हॅक्सिनचे डोज प्राप्त झाले होते. त्यानंतर लसीकरणाचा दुसरा साठा १४ हजार ५०० डोस मिळाला आहे. आतापर्यंत एकंदरीत ३३ हजार ५०० डोस प्राप्त झाले आहे.
-------------------
लसीकरणात महिलांचे प्रमाण ६५ टक्के
आराेग्य सेवेतील नर्स आणि सिस्टर्स आदी महिलांचे प्रमाण जास्त असल्याने ६५ टक्के महिलांचे लसीकरण झालेले आहे.
---------------------
जिल्ह्यात समाधानकारक काम सुरू
सध्या जिल्ह्यात समाधानकारकरित्या सुरू आहे. लसीकरणाबाबत कुठूनही नकार नाही. लसीकरणादरम्यन ताप येणे अशा किरकोळ इन्फेक्शन व्यतिरिक्त कुठलीही बाधा झालेली नाही.
- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी