जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांची ९१ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2016 00:11 IST2016-07-17T00:11:49+5:302016-07-17T00:11:49+5:30
जात वैधता प्रमाणपत्राच्या अभावासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या ९१ सदस्य पदे रिक्त आहेत.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांची ९१ पदे रिक्त
आयोगाने मागितली माहिती : जात वैधतेअभावी ७३ सदस्यत्व रद्द
अमरावती : जात वैधता प्रमाणपत्राच्या अभावासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या ९१ सदस्य पदे रिक्त आहेत. याविषयीची माहिती राज्य निवडणूक आयोगाला मागितली आहे. डिसेंबर पूर्वी या पदांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
राखीव प्रभाग निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडावे लागतात. हे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत हे प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्यावे लागतात. अन्यथा उमेदवार विजयी झाल असला तरी मुदतीच्या आत प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ६ वर्षासाठी अपात्र राहण्याची वेळ येते.
जातवैधता प्रमाणपत्राची महत्त्वाची अट असल्याने अनुसूचित जमाती व भटक्या जमातीचे उमेदवार बहुतांश ग्रामपंचायती निवडणुकीस उपलब्ध होत नसल्याने येथील पद रिक्त राहिलेत. सलग तीन वेळा राखीव प्रभागातील पद रिक्त राहिल्यास चवथ्यांदा या पदाचे आरक्षण बदलविण्यात आले आहे. त्यामुळे यानंतर घेणाऱ्या ग्रामपंचातीच्या रिक्त पदांच्या निवडणुकीत बहुतांश ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या पदांचे आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत कुंड (सर्जापूर), बोरगाव (धर्माळे), बैलमारखेडा, रामा, हातखेडा, सार्सी, पाथरगाव, कळमजापूर, हिंगणगाव, पिंपळगाव निपाणी, सिध्दनाथपूर, जामगाव, जनुना, खिरसाना, नांदसावंगी, भगुरा, निमदरी, बेलखेडा, पिंपळखुटा, देवमाळी, रामापूर, बेलोरा, गोविंदपूर, खरपी, वाल्होडी, मोसाद, मिर्झापूर, तळणीपूर्णा, पणोरा, सामदा, घोडचंदी, घडा, लखाड, कोकर्डा, मायवाडी, गोराळा, बेलोना, शिरूर, भाईपूर, वाघोली, गणेशपूर, बिरोटी, सावलीपूर, नांदुरी, खाऱ्याटेंभू, चटबाबोड, कुटंगा, सुसर्दा, कारादा, दादरा, हिराबंबई, हरिसाल, काकादरी, सोनापूर, टेंब्रुसोडा, रुईपठार, रायपूर, माखली, खिरपाणी, सोमढाणा, अढाव, आमझरी, जामलीवन, डोमा व बारलिंगा, ग्रामपंचायतची पदे विविध कारणांनी रिक्त आहेत. डिसेंबरपूर्वी या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने गावखेड्यांमधील राजकारणाला वेग आला आहे. अनेक इच्छुकांनी जात वैधता प्रमाणपत्रांसह अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव युद्धस्तरावर सुरू आहे.
या ठिकाणी आरक्षण बदलाची शक्यता
जिल्ह्यात यापूर्वी २२ एप्रिल,२५ जुलै, १ नोव्हेंबर २०१५ व १७ एप्रिल २०१६ रोजी जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व रिक्त सदस्य पदांच्या निवडणूक झाल्यास मात्र ज्या राखीव प्रभागात उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नाही तेथे आता आरक्षण बदलाची शक्यता आहे. कुंड (सर्जापूर) बोरगाव (धर्माळे) व सोमठाणा खुर्द या ग्रामपंचायतीमधील राखीव प्रभागांचा समावेश आहे.