९६२ गुंतवणूकदार, कोट्यवधींची गुंतवणूक
By Admin | Updated: September 27, 2014 00:53 IST2014-09-27T00:53:51+5:302014-09-27T00:53:51+5:30
दोन वर्षात कमी भावात फ्लॅट उपलब्ध करुन देण्याची बतावणी करुन अमरावतीकरांना कोट्यवधी रुपयांनी ...

९६२ गुंतवणूकदार, कोट्यवधींची गुंतवणूक
अमरावती : दोन वर्षात कमी भावात फ्लॅट उपलब्ध करुन देण्याची बतावणी करुन अमरावतीकरांना कोट्यवधी रुपयांनी गंडविल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी राणा लॅन्डमार्क्सचा मुख्य सूत्रधार योगेश नारायण राणा याला अटक केली. त्याला शुक्रवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
योगेश राणा याने पोलिसांना राणा लॅन्डमार्क्समध्ये ९६२ जणांनी गुंतवणूक केल्याची कबुली दिली. नागपूर येथील राणा लॅन्डमार्क्स प्रा.लि.कंपनीने गर्ल्स हायस्कूल चौकातील एका हॉटेलमध्ये सन २०१२ मध्ये ‘प्रॉपर्टी शो’चे आयोजन केले होते. या माध्यमातून नागरिकांनी गुंतवणूक केली.
२६७ जणांना केले पैसे परत
फ्लॅट मिळत नसल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी राणा लँडमार्ककडे गुंतवणूक केलेले त्यांचे पैसे परत मागितले. यातील २६७ गुंतवणूकदारांना अंदाजे ३ कोटी ६ लाख ४३ हजार रुपये परत केले. १६२ जणांना पूर्ण व १०५ जणांना काही रक्कम परत दिल्याची बाब पोलीस तपासात स्पष्ट झाली आहे.
तक्रारीतील दोन नावांचा उलगडा
गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांनी गंडा घातल्याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी राणा लँडमार्क्सचा मुख्य सूत्रधार योगेश राणा याच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन योगेश राणा याला अटक केली. परंतु यातील उर्वरित आरोपींची नावे सांगण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. अखेर याप्रकरणामध्ये चंद्रशेखर राणा, एस.एन जिचकार यांच्यासह राणा लँडमार्क्सच्या काही प्रतिनिधींना आरोपी केल्याची माहिती शहर कोतवाली पोलिसांनी दिली.