एमआयडीसीतील ८९ मालमत्तांचा लिलाव

By Admin | Updated: May 13, 2016 00:13 IST2016-05-13T00:13:22+5:302016-05-13T00:13:22+5:30

थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी जप्त केलेल्या एमआयडीसीतील ८९ मालमत्तांचा ७ जून ला जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.

89 auctioned properties of MIDC | एमआयडीसीतील ८९ मालमत्तांचा लिलाव

एमआयडीसीतील ८९ मालमत्तांचा लिलाव

७ जूनचा मुहूर्त : उपायुक्तांचे आदेश, औद्योगिक विश्वात खळबळ
अमरावती : थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी जप्त केलेल्या एमआयडीसीतील ८९ मालमत्तांचा ७ जून ला जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. नजीकच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. महापालिका आयुक्तांच्या निर्देशाने उपायुक्त प्रशासन यांनी गुरुवारी हे आदेश काढलेत. जाहीर लिलावाच्या आदेशाने अंबानगरीतील औद्योगिक विश्वात मोठी खळबळ माजली आहे.
वॉर्ड क्र. ६१, एमआयडीसीमधील ६६ आणि वॉर्ड क्र. ६८ सातुर्णा एमआयडीसीमधील २७ औद्योगिक मालमत्तांचा यात समावेश आहे. मे २०१५ पासून ही थकबाकी आहे. या जप्त मालमत्तांचा ७ जून रोजी दुपारी ४ वाजता महापालिका उपायुक्तांच्या कार्यालयात जाहीर लिलाव करण्यात येईल. यात प्रामुख्याने लक्ष्मी फेब्रिकेटर्स, बोथरा इंडस्ट्रीज, रुपा गॅस सर्विस, आदित्य स्टील, श्रीराम उद्योग, प्रेमप्रकाश इंड्रस्टी, सोना केमिकल, क्रिस्टल केमिकल, सुभेदार इंड्रस्टीज, श्रीनाथ इंड्रस्टीज, आर. एस. इंड्रस्टीज, शक्ती रोलिंग शटर्स, गुडडे फुड प्रॉडक्ट, जाधव उद्योग, जाधव इंंजिनियरिंग, शीतल इंड्रस्टीज, रुचिदा स्पा, मनीष आॅरगॉनिक्स या सह ८९ औद्योगिक मालमत्तांचा समावेश आहे.
महापालिकेस देणे असलेली रक्कम देण्यास कसूर केल्याने ही मालमत्ता जप्त करण्यात आली व त्यानंतर या मालमत्तांच्या जाहीर लिलावाची नोटीस काढण्यात आली आहे. खरेदीदारास २१ व्या दिवशी मालमत्तेचे विक्री प्रमाणपत्र करून देण्यात येईल व सदर मालमत्तेचा खरेदीदारास नियमाप्रमाणे कब्जा देण्यात येईल. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतरही एमआयडीसी आणि सातुर्णा येथील बहुतांश मालमत्ताधारकांनी कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकविला होता. त्यासाठी काही मालमत्ताधारक न्यायालयात गेले होते. त्या पार्श्वभूमिवर त्या ८९ मालमत्ता जप्त करून त्यांचा जाहीर लिलाव करण्याच्या कार्यवाहीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
जाहीर लिलावास सामोरे जाणाऱ्या या ८९ औद्योगिक मालमत्ताधारकांकडे कोट्यवधी रुपये महापालिकेला घेणे आहेत. ती रक्कम न चुकविल्याने त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 89 auctioned properties of MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.