८.७९ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

By Admin | Updated: March 18, 2016 00:26 IST2016-03-18T00:26:31+5:302016-03-18T00:26:31+5:30

सन २०१५-१६ चे सुधारित व सन २०१६-२०१७ च्या मूळ अंदाजपत्रकानुसार ८ कोटी ७९ लक्ष ८२ हजार ६०४ रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प गुरूवारी जिल्हा परिषदेत सादर करण्यात आला.

8.79 crore balance budget | ८.७९ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

८.७९ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

जिल्हा परिषद : सुधारित अंदाजपत्रक १८ कोटी ४३ लाखांचे
अमरावती : सन २०१५-१६ चे सुधारित व सन २०१६-२०१७ च्या मूळ अंदाजपत्रकानुसार ८ कोटी ७९ लक्ष ८२ हजार ६०४ रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प गुरूवारी जिल्हा परिषदेत सादर करण्यात आला.
सन २०१५-१६ च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार जि.प.चे एकूण महसुली उत्पन्न १८ कोटी ४३ लक्ष ७४ हजार रूपयांचे आहे. सन २०१६-१७ चे मूळ १३ कोटी २९ लाख ७७ हजार रूपयांचे अंदाजपत्रक अर्थसभापती सतीश हाडोळे यांनी १७ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात सादर केले. या अंदाजपत्रकात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. शिक्षण, महिला बालकल्याण, कृषी, समाजकल्याण आणि अपंगांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरुणा गोरले, सरिता मकेश्वर, सीईओ सुनील पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांच्यासह जि.प. सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे सन २०१५-१६ चे सुधारीत अंदाजपत्रकानुसार एकूण महसूल उत्पन्न १८ कोटी ४३ लाख ७४ हजार ५३० रुपयांचे असून सन २०१६-१७ चे अंदाजपत्रकीय मूळ उत्पन्न १३ कोटी २९ लाख ७७ हजार अपेक्षित आहेत. सन २०१६-१७ ची एकूण महसूल जमा रक्कम १३ कोटी २९ लाख ७७ हजार ५३० रुपये इतका आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी केलेली ५० ऐवजी ६० लाख रूपये तरतूद करावी, डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंती साजरी होत असल्याने किमान एका जिल्हा परिषद सदस्याच्या मतदारसंघातील ५ गावांमध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाची कामे करता यावीत, असा प्रस्ताव प्रताप अभ्यंकर, बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, रवींद्र मुंदे आदींनी मांडला. यावर आवश्यकतेनुसार तरतूद करण्याचे आश्वासन वित्त सभापती सतीश हाडोळे यांनी दिले.
सिंचन विभागातील तरतुदींबाबत सुरेखा ठाकरे यांनी मुद्दा उपस्थित केला. जलयुक्त शिवार योजनेतून अनेक कामे झाली असल्याने यासाठी करण्यात आलेली तरतूद इतर महत्त्वाच्या कामांसाठी करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या सूचना सभापतींनी मान्य केल्यात.
अनेक योजनांवर अनावश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून हा निधी इतर महत्त्वाच्या कामांसाठी वळता करण्याची सूचना प्रताप अभ्यंकर यांनी केली. इतर सदस्यांनीही काही मुद्यांवर सभागृहात बाजू मांडली. त्या सूचना सभागृहाच्या संमतीने मान्य करण्यात आल्या आहेत. त्यांचा समावेश सुधारित अंदाजपत्रकात करण्यास जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी सूचित केले.
यावेळी माजी अध्यक्ष तथा सदस्य बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, रवींद्र मुंदे, प्रताप अभ्यंकर, महेंद्र गैलवार, बापूराव गायकवाड प्रमोद वाकोडे, सदाशिव खडके, प्रवीण घुईखेडकर, उमेश केने, मोहन सिंघवी, ममता भांबुरकर, पं.स.सभापती विनोद टेकाडे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, वरिष्ठ लेखाधिकारी राजेंद्र खैरनार, अशोक तिनखेडे, सुभाष बोडखे, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, जे.एन आभाळे व खातेप्रमुख उपस्थित होते.

Web Title: 8.79 crore balance budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.